गाव दारूबंदीसाठीची ग्रामसभा कोरमअभावी करावी लागली तहकूब
By Admin | Updated: February 26, 2015 01:39 IST2015-02-26T01:39:39+5:302015-02-26T01:39:39+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गावात दारूबंदी करण्यासाठी कोरेगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलाविली होती. मात्र सदर ग्रामसभा कोरमअभावी तहकूब ...

गाव दारूबंदीसाठीची ग्रामसभा कोरमअभावी करावी लागली तहकूब
देसाईगंज : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गावात दारूबंदी करण्यासाठी कोरेगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलाविली होती. मात्र सदर ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्याची पाळी ग्रा. पं. प्रशासनावर आली. दारूविक्रेत्यापुढे प्रशासन हतबल असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले आहे.
कोरेगावात दारूबंदीसाठी आता महिलांनी मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा तक्रार दाखल केली आहे. मात्र स्थानिक प्रशासन दारूबंदीबाबत अनुकूल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरेगावात दारूविक्रेत्यांनी कळस गाठला आहे. सायंकाळी बसस्थानक परिसरात केवळ दारूड्यांचा उत्पात सुरू राहतो. पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर नाममात्र कारवाई करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. दिवसागणीक गावातील दारूविक्रेत्यांची संख्या वाढत चालली आहे. पोलीस प्रशासनाला याबाबतची सर्व माहिती असूनही आजवर गावात कोणतीही मोठी कारवाई दारूविक्रेत्यांच्या विरोधात झालेली नाही. गावातील एका गल्लीत तर दिवसाढवळ्या महिला जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करण्यास हतबल असल्याने गावातील महिलांनी अवैध दारूविक्रीबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गावात दारूविक्रेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले असतानाही ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती व गावातील नागरिक बघ्याची भूमिका घेऊन आहेत. परंतु महिलांचा त्रास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे ग्रामसभेवर दबाव आला व नाईलाजास्तव ग्रामपंचायतने अवैध दारूविक्रीविरोधात बंदी घालण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. मात्र गावातील नागरिकाची ग्रामसभेला अत्यल्प उपस्थिती असल्याने मंगळवारी ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यानंतर तहकूब झालेली ग्रामसभा २८ फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यापूर्वी दारूबंदीबाबत पोलीस प्रशासनानेदेखील गावात सभा घेतली होती. मात्र सभेनंतर दारूविक्रीचा जोर अधिक वाढला. लोकहितास्तव जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दारूविक्री अनेक गावात जोमाने सुरू आहे. याला कोरेगावही अपवाद नाही. दररोज दारू माफीयांची चारचाकी वाहने गावागावात घरपोच दारू पोहोचवितात. लहान दुकानदारांवर कारवाई करून मोठ्या दुकानदारांना अभय देण्याची भूमिका पोलीस नेहमी घेत असल्यामुळे दारूबंदी गावात नावालाच उरलेली आहे, अशी परिस्थिती आहे. (वार्ताहर)