गावात विकास काम करूनही ग्रामपंचायतींना आर्थिक घरघर
By Admin | Updated: December 25, 2014 23:32 IST2014-12-25T23:32:47+5:302014-12-25T23:32:47+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदस्तरावरून विविध विकास कामे दिली जात आहे.

गावात विकास काम करूनही ग्रामपंचायतींना आर्थिक घरघर
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदस्तरावरून विविध विकास कामे दिली जात आहे.
ग्रा.पं. मार्फत मागील पाच वर्षात १०० ते सव्वाशे कोटीचे काम करूनही ग्रामपंचायतीची आर्थिक अवस्था अद्याप डबघाईस आलेल्या स्थितीत आहे.ग्रामपंचायतीमार्फत केली जाणारी विविध कामे ही ग्रा.पं.च्या नावावर राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्ते व ग्रामसेवकच ठेकेदार म्हणून करीत असल्याने कामाचा दर्जाही सुमार असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २०१० नंतर तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला. तसेच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या डीपीडीसीचा फंड २१ कोटीवरून सव्वाशे कोटीवर नेण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायतीला उपलब्ध झाला.
नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे दुर्गम भागात कंत्राटदार काम करण्यास धजावत नव्हते. ग्रामपंचायतीमार्फत कामे झाल्यास काम अर्धवट राहणार नाही, अशी या मागची भूमिका होती. यासाठी शासनाने ग्रामफंडात पाच टक्के रक्कम जमा करण्याची अटही शिथील करून ग्रामपंचायतीला पूर्ण मुभा दिली. मात्र पाच वर्षात सव्वाशे कोटीचे काम करूनही ग्रामपंचायतीची हलाखीची स्थिती दूर झालेली नाही. अनेक ग्रामपंचायती कर्जबाजारी आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)