नगर पंचायत की ग्राम पंचायत?
By Admin | Updated: April 9, 2015 01:35 IST2015-04-09T01:35:25+5:302015-04-09T01:35:25+5:30
जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

नगर पंचायत की ग्राम पंचायत?
विलास चिलबुले आरमोरी
जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र आरमोरीत नगर पंचायत होणार की, ग्राम पंचायतच राहणार याबाबत येथील इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परिणामी आरमोरी शहरात ग्रा. पं. निवडणुकीतही निरूत्साह पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण ग्राम पंचायत म्हणून आरमोरी ग्राम पंचायतीचाही सहभाग आहे. तत्कालीन राज्य सरकाने प्रत्येक तालुका मुख्यालयात ग्रा. पं. ला नगर पंचायतीचा दर्जा देण्याचे घोषित केले होते. मात्र गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून येथील बारा तालुक्यांपैकी दोनच तालुका मुख्यालयात ग्राम पंचायत मोठी आहे. व इतर दहा ग्राम पंचायत कमी लोकसंख्येच्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून नगर परिषदेची मागणी असलेली आरमोरी व चामोर्शी ग्राम पंचायत आहे. आरमोरी ग्राम पंचायतची निवडणूक जाहीर झाल्याने नगर परिषद की ग्राम पंचायत या संभ्रमात उमेदवार आहेत.
आरमोरी ग्राम पंचायत बरखास्त होऊन नगर पंचायतीची निवडणूक होणार म्हणून मागील तीन ते चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यामुळे हौशी उमेदवार नगर सेवक पदाचे बासींग बांधून होते. सरपंच पदाचेही आरक्षण जाहीर झाल्याने ही निवडणूक होणारच अशी चर्चा आरमोरीत आहे. मात्र या संदर्भात अनेक उमेदवार तहसील कार्यालयातून माहिती घेत असता, यामध्ये ग्राम पंचायत निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यांतच नगर पंचायत जाहीर होऊन आरमोरी ग्राम पंचायत बरखास्त होईल, अशी माहिती त्यांना सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण येत आहे. त्यामुळे निवडणूक लढवायची कोणती? या संभ्रमात उमेदवार पडला आहे. आरमोरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या जि. प. व पं. स. सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस जाहीर झाल्याने त्यांचे पद गोठवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या प्रोसेसिंगला सहा महिन्यांचा कालावधी लागतो. ग्राम पंचायत निवडणुका एप्रिल- मे महिन्यांतच होणार असल्याने उमेदवारांची गोची होत आहे.