ग्रामपंचायत सदस्याने स्वतःचे अतिक्रमण पहिल्यांदा काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:55 IST2021-02-23T04:55:25+5:302021-02-23T04:55:25+5:30
वैरागड येथील नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य सत्यदास रामजी आत्राम यांचे घर इंदिरा गांधी चौकात आहे. गांधी चौकापासून पुढे डॉ. बाबासाहेब ...

ग्रामपंचायत सदस्याने स्वतःचे अतिक्रमण पहिल्यांदा काढले
वैरागड येथील नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य सत्यदास रामजी आत्राम यांचे घर इंदिरा गांधी चौकात आहे. गांधी चौकापासून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाॅर्डाकडे जाणाऱ्या सार्वजनिक नालीवर मागच्या वर्षात त्यांच्या बाथरूमची एक भिंत आली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाॅर्ड नं. ३ मधून आत्राम हे विजयी झाले. आता आपल्याला गावातील रस्त्यावरील होणारे अतिक्रमण थांबवणे, प्रसंगी सभागृहात निर्णय घेऊन स्वच्छ, सुंदर गावासाठी मुख्य रस्त्यावर होणारे अतिक्रमण काढून टाकावे लागणार आहे. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून आपल्या कर्तव्यात कसूर नको म्हणून सत्यदास आत्राम यांनी स्वतः केलेले अतिक्रमण आधी काढून घेतले.
ग्रामपंचायत सदस्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वैरागड येथील जुने मोटार स्टँड ते ग्रामपंचायत चौकापर्यंतचा मुख्य रस्ता आधीच अरुंद असताना अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने या रस्त्यावर थाटली आहेत. रस्त्यालगत असलेल्या दुतर्फा नाल्यावर विक्रीच्या वस्तू आहेत. या मार्गाने ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी यांना रस्ता ओलांडताना अनेकदा अडचणी निर्माण होतात. गावातील इतर रस्त्यांवर देखील शेतीचे साहित्य ठेवणे, रस्त्याच्या कडेला जनावरे बांधणे यामुळे गावाचे स्वरूप बिघडले आहे; पण याकडे आजपर्यंत स्थानिक प्रशासन, प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही किंवा गाव स्वच्छ, सुंदर दिसावे अशी इच्छाशक्ती दाखवली नाही; पण एका नवनिर्वाचित सदस्याने स्वतःचे अतिक्रमण काढून एक चांगला पायंडा पाडला आहे.