ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:31+5:302021-01-13T05:36:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. ...

Gram Panchayat elections will be very tense | ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार

ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे संलग्नित पॅनल व गट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गावागावांतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या वेळची निवडणूक ही अतिशय रंगतदार व चुरशीची होणार आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने गावखेड्यात गटातटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले आहे. या निवडणुकीत अनेक माजी सरपंचांसह गावातील अनेक दिग्गज उभे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात नवखे उमेदवार पहिल्यांदाच ग्रामपंचायतची निवडणूक लढवीत आहेत. गावातील प्रमुख गट व पॅनलसाठी ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरणारी आहे. ग्रामपचायतींवर आपली निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप सुरू आहे.

आरमोरी तालुक्यातील २१४ जागांसाठी ४९९ उमेदवार एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत. निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आल्याने उमेदवारांची घामाघूम वाढत चालली आहे.

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा पाया असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. राजकीयदृष्ट्या विचार करता ग्रामपंचायत ही आपल्या गटाची व पक्षाशी संलग्नित असावी व गावातील ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत.

तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड, वडधा व त्याखालोखाल जोगीसाखरा येथील ग्रामंचायत निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. वैरागड येथील एका माजी सरपंचाच्या एकाच परिवारातील तीन उमेदवार ग्रामपंचायतची निवडणूक लढत आहेत. या ग्रामपंचायतमध्ये तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. जोगीसाखरा येथे एका राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्ष निवडणूक लढवीत आहे. एकंदरीत प्रमुख राजकीय पक्षाचे गावातील प्रमुख पदाधिकारी पॅनल उभे करून निवडणूक लढवीत आहेत. अनेक कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत.

बाॅक्स...

गावाच्या विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध

- लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा राजकीय पक्ष जसा निवडणूक जाहीरनामा काढतात तसाच जाहीरनामा गावाच्या विकासासंदर्भात अनेक प्रमुख गावांत काढण्यात आला आहे. काहींनी वर्षभराचे गृहकर भरण्यापासून तर गावात पिण्याचे शुद्ध पाणी, नळ जोडणी, नाल्या, रस्ते, स्वच्छता यावर भर देऊ, असे आश्वाासन गावकऱ्यांना देत आहेत. या निवडणुकीत असे आश्वासन कितपत प्रभावी ठरते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

- ग्रामपंचायतचे प्रभाग लहान राहत असल्याने प्रत्येक मताला महत्त्व असते. त्यामुळे आपल्या माणसाची मते वाया जाऊ नयेत म्हणून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नात आहेत. गावांमधील अनेक लोक कामाच्या शोधात बाहेरगावी मिरची तोडण्यासाठी गेले आहेत. त्यांनाही मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. मतदार यादीत नाव आहे पण ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या व जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना शेवटच्या टप्प्यात मतदानाला आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Gram Panchayat elections will be very tense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.