दीड हजार लाभार्थ्यांना मिळणार गॅस कनेक्शन

By Admin | Updated: November 4, 2015 01:47 IST2015-11-04T01:47:22+5:302015-11-04T01:47:22+5:30

राज्य शासनाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शन देण्यासाठी एक कोटी रूपयांचे

Grace connections will be available for 1.5 thousand beneficiaries | दीड हजार लाभार्थ्यांना मिळणार गॅस कनेक्शन

दीड हजार लाभार्थ्यांना मिळणार गॅस कनेक्शन

दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
राज्य शासनाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शन देण्यासाठी एक कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानातून २०१५-१६ या वर्षात अनुसूचित जातीचे १ हजार १९ व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील ४६२ अशा एकूण १ हजार ४८१ लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर वन विभागाकडून गॅस कनेक्शन देण्यात येणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या पाचही वन विभागात वृक्षतोड कमी व्हावी, जंगलावरील सरपणाचा भार कमी व्हावा, या उद्देशाने वन विभागामार्फत २०१२-१३ या वर्षापासून जंगलालगतच्या गावातील नागरिकांना ७५ टक्के अनुदानावर नवीन गॅस कनेक्शन देण्याची योजना राबविली जात आहे. याशिवाय वन विभागाकडून गॅस कनेक्शन मिळालेल्या लाभार्थ्यांना तीन वर्षापर्यंत मोफत २६ गॅस सिलिंडर पुरविण्याची जबाबदारी वन विभाग घेत आहे.
२०१५-१६ या वर्षात गडचिरोलीच्या वनवृत्त कार्यालयाला अनुसूचित जातीच्या १ हजार १९ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले. यासाठी राज्य शासनाने २८ आॅक्टोबर २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ६९.२९ लाख रूपयांची तरतूद मंजूर केली आहे. अनुदान मंजूर झाल्याने सदर निधी विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एकूण ७०४ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वितरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने वन विभागाला दिले आहे. यापैकी शासनाने ४६२ लाभार्थ्यांकरिता ३१.४२ लाख रूपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यासंदर्भात शासनाने २८ जुलै २०१५ रोजी परिपत्रक काढले आहे. अनुदान मंजूर करण्यात आलेल्या ४६२ लाभार्थ्यांचे वन विभागनिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये गडचिरोली वन विभागाला १००, सिरोंचा १००, आलापल्ली १०० व वडसा वन विभागाला १६२ लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आले आहे.
शासनाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थी उद्दिष्ट व अनुदान चालू वर्षात मंजूर केलेले नाही. वन विभागामार्फत ९ हजार १० रूपये किंमतीचे गॅस कनेक्शन लाभार्थ्यांना दिले जाते. यामध्ये लाभार्थ्यांना २५ टक्के म्हणजे २ हजार २५२.५० रूपये भरावे लागतात. तर शासनाकडून ६ हजार ७५७.५० रूपयांचे ७५ टक्के अनुदान लाभार्थ्यांना मिळते. एकूणच वन विभागाच्या या योजनेमुळे जंगलावरील भार कमी झाला आहे.

तीन वन विभागात गॅस सिलिंडरचा तुटवडा
४वन विभागाने तालुका ठिकाणच्या गॅस एजन्सीसोबत गॅस कनेक्शन व गॅस सिलिंडर पुरवठा करण्याबाबतचा करार केलेला आहे. गडचिरोली व वडसा वन विभागाअंतर्गत असलेल्या गॅस एजन्सी केंद्रांमध्ये गॅस सिलिंडरचा पुरेसा पुरवठा आहे. मात्र भामरागड, सिरोंचा, आलापल्ली या तीन वन विभागाअंतर्गत असलेल्या गॅस एजन्सीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या वन विभागातील लाभार्थ्यांना सिलिंडर मिळण्यासाठी विलंब होत आहे. तसेच गॅस एजन्सीचे ठिकाण लांब अंतरावर असल्याने अनेक गॅसधारकांना कसरत करावी लागत आहे.

गतवर्षी दोन हजारांवर लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन
४पाचही वन विभागामार्फत जिल्ह्यात गतवर्षी २०१४-१५ मध्ये अनुसूचित जमातीच्या ५२३ अनुसूचित जातीच्या ३२४ व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील १ हजार २८२ अशा एकूण २ हजार १२९ लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शन देण्यात आले. यामध्ये अनुसूचित जमातीच्या ५२३ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले. यात आलापल्ली वन विभागाअंतर्गत ४५४ गडचिरोली वन विभागाअंतर्गत ३४ व वडसा वन विभागाअंतर्गत ३५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. गतवर्षी २०१४-१५ मध्ये गडचिरोली वन विभागाअंतर्गत ६९ व वडसा वन विभागाअंतर्गत २५५ अशा एकूण ३२४ अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील ४३५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले. यामध्ये आलापल्ली वन विभागाअंतर्गत ३१७, गडचिरोली २७ व वडसा वन विभागाअंतर्गत ९१ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचा लाभ देण्यात आला आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात रक्कम
४गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली या पाचही वन विभागाअंतर्गत एकूण ८६१ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. वन संरक्षण संवर्धनासोबतच योजनांच्या अंमलबजावणीसाठी समितीचे सदस्य सहकार्य करतात. वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गॅस कनेक्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. या रकमेतून समितीचे सदस्य गॅस कनेक्शन वितरणासाठी वन कर्मचाऱ्यांना सहकार्य करतात.

Web Title: Grace connections will be available for 1.5 thousand beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.