ग्रा.पं. सदस्यांच्या ४७४ जागा रिक्त

By Admin | Updated: May 3, 2016 01:45 IST2016-05-03T01:45:00+5:302016-05-03T01:45:00+5:30

आगष्ट अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त असलेल्या ग्रा.पं. सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा

G.P. 474 members of the vacancies are vacant | ग्रा.पं. सदस्यांच्या ४७४ जागा रिक्त

ग्रा.पं. सदस्यांच्या ४७४ जागा रिक्त

दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
आगष्ट अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त असलेल्या ग्रा.पं. सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जारी केला होता. १७ एप्रिल रोजी ग्रा.पं.च्या निवडणुका पार पडल्या. मात्र नागरिकांकडून नामांकनच दाखल करण्यात न आल्याने जिल्ह्यातील तब्बल १४८ ग्रामपंचायतीमधील तब्बल ४७४ सदस्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. परिणामी प्रशासनाला आणखी या ग्रा.पं.मध्ये निवडणुका घेण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाने आॅगस्ट २०१६ अखेर मुदत संपणाऱ्या भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा, एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा, चामोर्शी तालुक्यातील घोट व गडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी या चार ग्रामपंचायतीच्या एकूण ४२ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यापैकी मिरगुडवंचा ग्रा.पं.मध्ये अविरोध निवड झाली तर घोट व पारडी कुपी ग्रा.पं.ची निवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली. मात्र एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा ग्रा.पं.च्या सदस्यांच्या नऊ जागांसाठी एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे येथील नऊ जागा रिक्त आहेत.
जिल्हा प्रशासनाने बाराही तालुक्यातील १६३ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या ५१० जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला. यापैकी १६ ग्रा.पं. मध्ये ४३ उमेदवार अविरोध निवडून आले. मात्र नामांकन दाखल न झाल्याने तब्बल १४७ ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या एकूण ४६५ जागा रिक्त राहिल्या आहेत.
प्रशासनाने सदस्यांच्या जागा रिक्त असलेल्या भामरागड तालुक्यातील १७, एटापल्ली तालुक्यातील १९, अहेरी तालुक्यातील १७, चामोर्शी १७, गडचिरोली ५, धानोरा ३७, कुरखेडा ६, कोरची १६, देसाईगंज १, आरमोरी २, मुलचेरा ९ व सिरोंचा तालुक्यातील १७ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतीमध्ये १७ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया घेण्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या सर्व ग्रा.पं.मधून ५१० जागा निवडून द्यावयाच्या होत्या. यापैकी वायगाव ग्रा.पं.ची पोटनिवडणूक पार पडली व इतर ग्रामपंचायतीमधून ४३ उमेदवार अविरोध निवडून आले. मात्र नामांकनच दाखल न झाल्याने एकूण १४७ ग्रा.पं.मधील ४६५ जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.

जात वैधता प्रमाणपत्राचाही अभाव
४ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा, कोरची, मुलचेरा, सिरोंचा या तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक नागरिक अद्यापही अशिक्षित आहेत. परिणामी ते जात वैधता प्रमाणपत्र काढत नाही. यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यापासून वंचित राहावे लागते. जात वैधता प्रमाणपत्राअभावी नामांकन दाखल होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या अनेक जागा दरवर्षी रिक्त राहतात.

नक्षली दहशतीचा परिणाम
४राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. मात्र नक्षल प्रभावित दुर्गम भागातील नागरिकांमध्ये नक्षल्यांची दहशत कायम असल्याने अनेक नागरिक ग्रा.पं. निवडणुकीत नामांकन दाखल करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे प्रशासनाला नामांकन प्राप्त न झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुका रद्द कराव्या लागतात. त्यानंतर पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर जिल्हा प्रशासन रिक्त राहिलेल्या ग्रा.पं.च्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करते. नक्षली दहशतीमुळे जिल्ह्यात वर्षभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जातो.

Web Title: G.P. 474 members of the vacancies are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.