गोंविद पानसरे हल्लाप्रकरण : विविध समाजिक संघटनांचा तीव्र संताप पुरोगामी अभिव्यक्तीच्या मुस्कटदाबीचा निषेध
By Admin | Updated: February 17, 2015 01:44 IST2015-02-17T01:44:58+5:302015-02-17T01:44:58+5:30
आरमोरी : १६ फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोल्हापूर येथे भाडोत्री

गोंविद पानसरे हल्लाप्रकरण : विविध समाजिक संघटनांचा तीव्र संताप पुरोगामी अभिव्यक्तीच्या मुस्कटदाबीचा निषेध
आरमोरी : १६ फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोल्हापूर येथे भाडोत्री हल्लेखोरांनी पुरोगामी विचारवंत तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. भाकपाचे जिल्हा महासचिव डॉ. महेश कोपुलवार यांच्या नेतृत्वात, या भ्याड हल्ल्याचा भाकपाच्या वतीने आरमोरी येथे चक्काजाम व निदर्शने करून निषेध केला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदनात गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यातील आरोपी व मुख्य सुत्रधारांना तत्काळ अटक करण्याची मागणी भाकपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी निवेदन देतांना देवराव चवळे, जि. प. सदस्य अमोल मारकवार, हिरालाल येरमे, अॅड. जगदिश मेश्राम, हर्षवर्धन कार, प्रदीप नागन्ना, सुकरू घरत, अनिल चहांदे, बाळकृष्ण पेंदाम, चंद्रभान मेश्राम, डंबाजी नरूले, संजय चरडुके, रमेश मेश्राम, विनोद झोडगे, एकनाथ मेश्राम, विशाल दामपल्लीवार, सरपंच शालू इंदूरकर यांच्यासह चक्काजाम आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विचारांना संपविण्याचे प्रतिगाम्यांचे षड्यंत्र- रमेशचंद्र दहीवडे पुरोगामी विचारांचा वैचारिकदृष्ट्या आपण पराभव करू शकत नाही. हे सनातण्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचारवंतांनाच संपविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना एक वर्षाचा कालावधी लोटूनही पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे गुंडांची हिंमत वाढत चालली आहे. या वाढलेल्या हिंमतीतूनच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर केलेला हल्ला हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात नेमके काय घडत आहे, हे कळायला मार्ग नाही. मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी. अशोभनीय कृत्य- नामदेव उसेंडी पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात सर्वधर्म समभाव जोपासणारे काही बोटावर मोजणारे विचारवंत आहेत. सनातणी विचारांनी बरबटलेल्या लोकांचे हे अत्यंत निंदणीय कृत्य आहे. हे महाराष्ट्राला मागे नेण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. या प्रकाराची जेवढी निंदा केली तेवढे कमी आहे. सरंजामदारांचा भ्याड हल्ला- महेश कोपुलवार प्रतीगामी आणि सरंजामदारांच्या भ्याड गुंडांनी केलेल्या या हल्ल्याचा आपण निषेध करीत आहो. अॅड. गोविंद पानसरे व उमा पानसरे यांनी सदैव पुरोगामी विचारांचा प्रसार केला. त्यांच्यावर झालेला हा हल्ला भांडवलदार व्यवस्थेने केला आहे. शासनाने तत्काळ मारेकरी शोधून त्यांना कडक शिक्षा द्यावी पुरोगामी चळवळीवरील हल्ला - रोहिदास राऊत नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी अजुनही मिळाले नाही. ते शोधणे पोलिसांसमारे आव्हान असतानाच पानसरे यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्यावरील हल्ला म्हणजे समतावादी पुरोगामी चळवळीवरील हल्ला आहे. राज्य व देशाचे सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या हेतूने हे हल्ले होत आहेत. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कडक शिक्षा द्यावी.