शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 23, 2016 01:17 IST2016-04-23T01:17:24+5:302016-04-23T01:17:24+5:30
जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
आनंदराव गेडाम यांची टीका : कुरखेडा येथे पत्रकार परिषद
कुरखेडा : जिल्ह्यात मागील दहा वर्षांत कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र संवेदनाहीन विद्यमान राज्य सरकार कोणतीच भरीव मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी तयार नाही. शेतकऱ्यांकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केला आहे.
स्थानिक विश्रामगृहात २२ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. मागील वर्षी सरसरीच्या ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावांसह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. शासनाने या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना तेथे सोयीसुविधा पुरविण्याचे आश्चासन दिले होते. मात्र आता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासन कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. कर्जाच्या खाईमुळे शेतकरी हवालदिल व निराश झाला आहे.
तीन वर्षांपूर्वी जून व जुलै २०१३ या कालावधीत विदर्भात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबाबत २०१३ च्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्यव्यापी पॅकेज जाहीर केले होते. विद्यमान शासन मात्र उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असतांनाही कोणतीही उपाययोजना करण्याच्या मन:स्थितीत नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देत भाजपाचे सरकार निवडून आले आहे. किमान निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन शासनाने पाळावे, असे आवाहन माजी आ. गेडाम यांनी केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेसचे प्रभारी जयंत हरडे, क्षेत्र प्रमुख अमोल पवार, धनराज लाकडे, रोहित ढवळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
केवळ आश्वासनावरच सरकारचा भर
राज्य व केंद्रातील सरकार विविध प्रकारचे नवनवीन आश्वासन देत जनतेची दिशाभूल करण्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू केले आहे. अत्यंत आकर्षक योजनांची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात येते. मात्र या योजनांची अंमलबजावणी शून्य असल्याने त्यांचे काहीच परिणाम दिसून येत नाही. राज्यभरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यावर शासन पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यास तयार नाही. केवळ काँग्रेसच्या जुन्या सरकारवर टीका करण्याचे काम विद्यमान भाजपा सरकार करीत आहे. सरकारने कृतीवर भर देण्याची मागणी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी केली.