शासनाचे जिल्हा संकेतस्थळ अद्यावतच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:13+5:30
गडचिरोली जिल्ह्याला गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. छत्तीसगड व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमांना जिल्हा लागून आहे. २ जून २०१४ ला आंध्रप्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे देशातील २९ वे नवे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे तेलंगणाच्या निर्मितीआधी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला आंध्रप्रदेश राज्य बदलवून आता तेलंगणा राज्य झाला.

शासनाचे जिल्हा संकेतस्थळ अद्यावतच नाही
अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : क्षणाक्षणाला नवनवे बदल होत असल्याने माहिती व तंत्रज्ञान या दोन्ही बाबतीत सतत अद्यावत राहणे आवश्यक झाले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या गडचिरोली जिल्हा संकेतस्थळावरील माहिती मागील सहा वर्षांपासून अपडेट झाली नसल्याचे दिसून येते.
सहा वर्षापूर्वी तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती होऊनही गडचिरोली जिल्ह्याला आंध्रप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. तसेच जिल्ह्यात तीन नगर परिषद असताना दोनच नगर परिषद असल्याचा उल्लेख केला आहे. तब्बल सहा वर्षापासून जिल्ह्याच्या वेबसाईटवर बदल करणे अपेक्षित असताना अजुनही जुनीच माहिती दिली जात आहे. याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात असून माहितीत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
गडचिरोली जिल्ह्याला गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. छत्तीसगड व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमांना जिल्हा लागून आहे. २ जून २०१४ ला आंध्रप्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे देशातील २९ वे नवे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे तेलंगणाच्या निर्मितीआधी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला आंध्रप्रदेश राज्य बदलवून आता तेलंगणा राज्य झाला. परंतु गडचिरोली जिल्हा संकेतस्थळावर जिल्ह्याच्या सीमेला आंध्रप्रदेश हाच राज्य लागून असल्याचा उल्लेख केला आहे. राज्य व जिल्ह्याचे नकाशे सुध्दा अपडेट झाले आहे.
आरमोरी नगर परिषदेचा उल्लेख नाही
सार्वजनिक सुविधा या टॅगखाली नगर पंचायत व नगर पालिका असे दोन पर्याय आहेत. नगर पंचायत समोर १० व नगर पालिकेसमोर दोन असे लिहिले आहे. नगर पंचायतवर क्लिक केल्यावर आरमोरी नगर पंचायत कार्यालय असल्याचे समोर येते. जिल्ह्यात सध्या नऊ नगर पंचायत आहे. मात्र यामध्ये नगर पंचायतीचा आकडा १० दाखविला जात आहे. आरमोरी पालिकेचा उल्लेख नाही.
जिल्हा संकेतस्थळावर जुनीच माहिती
जिल्हा संकेतस्थळावरील होमपेजवर गडचिरोली जिल्ह्याविषयी या टॅगवर क्लिक केल्यावर जिल्ह्याची माहिती येते. तिथे जुनीच माहिती दिली जात आहे. कोणतीही नवी माहिती मिळविण्यासाठी मोबाईल व संगणक हाताळणारे सर्वच लोक जिल्ह्याच्या या वेबसाईटचा आधार घेतात. मात्र येथील माहिती जुनी आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे व महाविद्यालयीन विद्यार्थी अद्यावत माहितीपासून दूर राहत आहेत. अद्यावत माहिती अपलोड करण्याची मागणी होत आहे.
बदली होऊन जिल्ह्याबाहेर गेलेले अधिकारी स्वत:हून माहिती देत नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या वेबसाईटवरील माहितीत लवकरच सुधारणा करण्यात येईल. अपडेट माहितीसह ही वेबसाईट लोकांना पहायला मिळेल.
एस. आर. टेंभुर्णे, जिल्हा सूचना अधिकारी, गडचिरोली