पीक स्पर्धेद्वारे शासन शेतकऱ्यांना करणार प्राेत्साहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:27 IST2021-05-28T04:27:24+5:302021-05-28T04:27:24+5:30

राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या ...

The government will encourage farmers through crop competition | पीक स्पर्धेद्वारे शासन शेतकऱ्यांना करणार प्राेत्साहित

पीक स्पर्धेद्वारे शासन शेतकऱ्यांना करणार प्राेत्साहित

राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. पीकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रबी हंगाम २०२० मध्ये पीकस्पर्धेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम २०२१ साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करुन पीकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त (कृषी) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

बाॅक्स

स्पर्धेत या बाबींचा आहे समावेश

पीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल अशा एकूण ११ पिकांचा समावेश आहे. प्रती तालुका सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ अशी स्पर्धक संख्या निश्चित केली आहे. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये प्रवेश शुल्क राहणार आहे.

बाॅक्स

अर्ज दाखल करण्याची मुदत

मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चालान, ७/१२, नमुना ८-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात

द्यावे, असे आवाहन केले आहे.

बाॅक्स

असे आहे बक्षिसाचे स्वरुप

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ४ पातळीवर बक्षीस मिळणार आहे. तालुकास्तरावर पहिले बक्षीस ५ हजार, दुसरे ३ हजार, तिसरे २ हजार, जिल्हा स्तरावर पहिले बक्षीस १० हजार, दुसरे बक्षीस ७ हजार, तिसरे बक्षीस ५ हजार, विभाग पातळीवर पहिले बक्षीस २५ हजार, दुसरे बक्षीस २० हजार, तिसरे बक्षीस १५ हजार तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार, दुसरे बक्षीस ४० हजार, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये दिले जाणार आहे.

Web Title: The government will encourage farmers through crop competition