शासकीय निवासस्थाने ओसाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:38 IST2021-04-20T04:38:11+5:302021-04-20T04:38:11+5:30
आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत ...

शासकीय निवासस्थाने ओसाड
आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
पोटेगाव रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात; परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे.
चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा
चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे, मात्र कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.
आरमोरीत वसतिगृह निर्माण करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाज कल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाज कल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी आहे.
आशीर्वादनगरात डुकरांचा हैदोस
गडचिरोली : गोकूळनगरलगत आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकरांच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिकांची झोपमोडही होते.
कुरूड परिसरात थ्री-जी सेवा नावापुरतीच
कुरूड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.
बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवहार करण्यासाठी मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
सोमनूर संगमाच्या विकासाकडे दुर्लक्ष
सिरोंचा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असते.