तीन गावांमधील शासकीय जमीन रेल्वेला होईल हस्तांतरीत
By Admin | Updated: February 18, 2017 01:54 IST2017-02-18T01:54:15+5:302017-02-18T01:54:15+5:30
वडसा-गडचिरोली या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गास गती देण्यात आली असून येत्या तीन दिवसात तीन गावांमधील

तीन गावांमधील शासकीय जमीन रेल्वेला होईल हस्तांतरीत
वडसा-गडचिरोली मार्ग : रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
गडचिरोली : वडसा-गडचिरोली या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गास गती देण्यात आली असून येत्या तीन दिवसात तीन गावांमधील शासकीय जमीन रेल्वे मार्गासाठी हस्तांतरीत होईल, अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिली.
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या भूमी हस्तांतरणासंदर्भात दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी नायक बोलत होते. बैठकीला मुख्य अभियंता पांडे, उपमुख्य अभियंता नबीन पात्रा, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शैलेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते. यापुढील काळात गतीमान पध्दतीने भूसंपादन व्हावे, याकरिता सदर रेल्वे मार्गावर भूसंपादन वाटाघाटीद्वारे करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार रेडीरेकनरचे दर गृहित धरून रेल्वे विभागाकडून रक्कम प्राप्त करून घेण्यात येत आहे. शासकीय जमीन हस्तांतरीत करण्याचे प्रस्ताव तीन गावांनी संमत केले आहे व सदर तीन प्रस्ताव २० फेब्रुवारीपर्यंत रेल्वे विभागाच्या नावे नोंदणी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी रेल्वे व जिल्हा प्रशासन आग्रही असून सदर मार्गाचे काम गतीमान पध्दतीने होण्यासाठी वडसा येथे नुकतीच बैठक पार पडली होती. सदर रेल्वे मार्ग जमीन हस्तांतरणाचे काम तसेच रेल्वे मार्गाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याच्या उद्देशाने साप्ताहीक बैठका घेऊन या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
खासगी जमीनधारकांना तत्काळ धनादेश
वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी महसूल, वन विभागाच्या मालकीसोबतच काही खासगी जमीन लागणार आहे. खासगी जमीन भूसंपादनाची प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. खासगी भूसंपादनांतर्गत जो शेतकरी दर मान्य करून आपली जमीन या रेल्वे मार्गास देण्यास तयार होईल, त्या भूधारक शेतकऱ्याला तत्काळ धनादेश प्रदान करण्यात येईल. आगामी काळात लवकरच खासगी जमीन या रेल्वे मार्गासाठी संपादीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी या बैठकीत दिली. रेल्वे, महसूल विभागासह जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया गतीने करण्यात येत असल्याने सदर रेल्वे मार्ग मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे.