गणेशनच्या कर्तृत्वाचा सरकारला विसर
By Admin | Updated: September 15, 2015 03:44 IST2015-09-15T03:44:09+5:302015-09-15T03:44:09+5:30
गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या

गणेशनच्या कर्तृत्वाचा सरकारला विसर
गडचिरोली : गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता एम. गणेशन यांनी या पुलाचे काम पूर्ण केले. नक्षलवाद्यांनी त्यानंतर त्यांची हत्या केली. गणेशन यांनी बीआरओच्या मार्फत काम करीत असताना या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज त्यांच्या बलिदानामुळे एटापल्ली तालुक्यातील अनेक गाव कायमस्वरूपी रस्त्याने जोडली गेली. त्यांच्या या कर्तृत्वाला गडचिरोली जिल्ह्यातील जनता कायम सलाम करीत राहिल. मात्र सरकारने या पुलाला अभियंता गणेशन यांचे नाव देण्याची घोषणा केली होती व तशी मागणीही एटापल्लीतील जनतेने केली होती. मात्र या बाबीचा सरकारला आता विसर पडल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय एम. गणेशन यांनी नक्षलवाद्यांच्या या विरोधाला न जुमानता आलदंडी नदीवरील पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण केले. अडंगे व जांभियागट्टा या दोन पुलाचेही काम त्यांनी त्याचवर्षी पूर्ण केले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची १४ जानेवारी २००६ ला निर्घृण हत्या केली. २६ जानेवारी २००७ ला गणेशनची पत्नी राखी हिला शौर्य चक्र देऊन राष्ट्रपतींनी सन्मानित केले. गणेशन यांचे बलिदान तालुक्याच्या विकासासाठी झाले. मात्र त्यांच्या शौर्य व चिकाटीमुळे गट्टा ते एटापल्ली हा ३६ किमीचा मार्ग पूर्ण झाला व दोन गावे कायमस्वरूपी एकमेकांशी जोडल्या गेली. गणेशन यांचे नाव एटापल्ली तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. त्यानंतर २००८-०९ मध्ये जिल्ह्यात निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लोकयात्रेने गणेशन यांच्या कुटुंबाची दखल घेऊन त्यांच्या पत्नीचा यात्रा समारोपप्रसंगी सत्कारही केला होता.
शासनानेसुद्धा आलदंडी पुलाजवळ अभियंता गणेशन यांचे स्मारक बांधून या पुलाला या शहिदाचे नाव द्यावे, अशी भावना या तालुक्यातील जनतेचीही होती. या पुलावरून वाहतूक सुरू होऊन बरेच वर्ष लोटले. बीआरओनेही गडचिरोली जिल्ह्यातून २०१० मध्ये गाशा गुंडाळला. त्यांच्यामुळे नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात रस्ते व पूल होऊ शकले. त्यानंतर या भागात विकासाचे काम मंदावले. या पुलाला गणेशनचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली होती. परंतु ८ वर्षाचा कालावधी लोटला. सरकारला या गोष्टीचा विसर पडला आहे.
१४ जानेवारीला गणेशन यांच्या हत्येला ९ वर्ष पूर्ण झालेत. या पुलामुळे शेकडो गाव जोडल्या गेली. केंद्र सरकारने गणेशनच्या कार्याची दखल घेतली. परंतु महाराष्ट्र शासनाला मात्र त्यांच्या कार्याचा विसर पडला असेच दिसून येत आहे. एकूणच या अभियंत्याचे वीर मरण या जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान देऊन गेले. (जिल्हा प्रतिनिधी)
बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे विकासात योगदान
४जिल्ह्यात एकूण ६२२.३२ किमी लांबीचे २१०७.४४ किमीचे रस्ते पूर्ण करण्यात आले. त्यामुळे १ हजार ६८८ गावांपैकी ९१५ गावे रस्ते मार्गाने जोडण्यात आले. जिल्ह्यातील १० लाख लोकसंख्येपैकी ६ लाख २७ हजार ७६१ लोकसंख्या रस्त्याशी जोडल्या गेली आहे. म्हणजे, जवळजवळ ६४.७२ टक्के लोकसंख्या बांधकाम विभागाने केलेल्या धडक कार्यक्रमामुळे रस्ते मार्गाने जोडली गेली. हे सर्व विकास काम करीत असताना गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आजवर जिल्ह्यात काम केलेल्या अभियंत्यांचे बहुमोलाचे योगदान राहिले आहे. अनेक अभियंत्यांनी मिशन समजून या जिल्ह्यात विकासाचे आराखडे तयार केले व कामे पूर्णत्वास नेली. त्यांच्या कतृत्वामुळे जिल्ह्यात दुर्गम भागापर्यंत रस्ते पोहोचू शकले हे विशेष.