लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: केंद्र सरकारने 'एआय' अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात घेऊन, शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी मोफत 'एआय' कोर्सेस सुरू केले आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या 'स्वयम' पोर्टलवर हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडवण्यासाठी एआयचा वापर कसा करावा, याचेही शिक्षण मिळणार आहे.
हे कोर्सेस शिक्षण, आरोग्य, कृषी आणि गेमिंग अशा विविध क्षेत्रांवर आधारित आहेत. देशातील अनेक तज्ज्ञांनी ते तयार केले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार होण्यास मोठी मदत होणार आहे.
नोंदणी आणि लॉगिन प्रक्रिया हे कोर्स करण्यासाठी 'स्वयम' या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा कोर्स निवडू शकता. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, कोणतेही शुल्क आकारले जात नाही. घरबसल्या विद्यार्थी व युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेता येणार आहे.
प्रत्येक अभ्यासक्रम २५ ते ४५ तासांचा असेलप्रत्येक कोर्सची रचना २५ ते ४५ तासांची आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळेत महत्त्वाचे ज्ञान मिळू शकते. यामुळे दैनंदिन अभ्यासावर परिणाम न होता, विद्यार्थी हे नवीन तंत्रज्ञान शिकू शकतील.
या एआय कोर्सेसचा समावेश
- एआय इन क्रिकेट अॅनालिटिक्स
- एआय इन फिजिक्स
- एआय इन केमिस्ट्री
- एआय इन अकाउंटिंग
कोण करू शकेल हा कोर्स ?हा कोर्स आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी करू शकतात. याशिवाय, ज्यांना एआयमध्ये रस आहे असे कोणीही या कोर्सचा लाभ घेऊ शकते.
क्रिकेटसाठी खास एआय कोर्सची केली निर्मितीक्रिकेटच्या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी 'एआय'चा कसा उपयोग होतो, हे शिकवले जाते. खेळाडू, प्रशिक्षक आणि विश्लेषकांना फायदा होऊ शकतो, हे विशेष.
विशेष तज्ज्ञांनी तयार केले आहेत अभ्यासक्रमहे अभ्यासक्रम देशातील नामांकित विद्यापीठांमधील आणि 'एआय' क्षेत्रातील तज्ज्ञांनी तयार केले आहेत. त्यामुळे यात शिकवलेले ज्ञान उच्च दर्जाचे आणि अद्ययावत आहे.
प्रमाणपत्रही मिळणारअभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'स्वयम' आणि शिक्षण मंत्रालयाकडून प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या संधींसाठी उपयोगी ठरू शकते.