गोठणगाव आरोग्य उपकेंद्राचा कारभार चालतो गोदामातून

By Admin | Updated: March 31, 2016 01:42 IST2016-03-31T01:42:59+5:302016-03-31T01:42:59+5:30

कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीची मागील तीन-चार वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही.

Gothgangaon Health Sub-center runs the godown | गोठणगाव आरोग्य उपकेंद्राचा कारभार चालतो गोदामातून

गोठणगाव आरोग्य उपकेंद्राचा कारभार चालतो गोदामातून

इमारतीची दुरवस्था : रुग्णांची हेळसांड
संदीप बावनकुळे कुरखेडा
कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीची मागील तीन-चार वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या इमारतीच्या भिंतींना तडा गेल्या असून दरवाजे तुटलेले आहेत. छत फुटल्यामुळे पावसाळ्यात सदर इमारत गळते. या भीषण परिस्थितीमुळे गावातील नागरिकांनी सदर आरोग्य उपकेंद्र ग्रामपंचायतीच्या गोदामात हलविले. तेव्हापासून या उपकेंद्राचा कारभार लहानशा इमारतीतून चालतो.
गोठणगाव हे तीन ते चार हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गोठणगाव येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात या उपकेंद्रात आरोग्यसेविका मुक्कामी राहत होती. मात्र या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे येथील आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. आरोग्य उपकेंद्र इमारतीतील शौचालय व बाथरूमची दारे तुटलेली आहेत. अनेक वर्षांपासून इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली नाही. सदर इमारत गावाच्या बाहेर असून सर्वांचेच इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्या सुमारास गोदामात हलविण्यात आलेले आरोग्य उपकेंद्र बंद राहते. परिणामी रात्रीच्या वेळी आकस्मिक रुग्णांना परत जावे लागते. आरोग्य उपकेंद्र असून सुद्धा प्रशस्त इमारतीअभावी गोठणगावातील नागरिक व रुग्णांची रात्रीच्या सुमारास प्रचंड होरपळ होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच येथील आरोग्य व्यवस्था बळकट करावी, अशी मागणी गोठणगावच्या नागरिकांनी केली आहे.

Web Title: Gothgangaon Health Sub-center runs the godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.