रेशीम उद्योगाला चांगले भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 01:46 IST2017-01-22T01:46:20+5:302017-01-22T01:46:20+5:30
गडचिरोली जिल्ह्यात रेशीम उद्योगाला अतिशय चांगले वातावरण असून रेशीम उद्योगातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा

रेशीम उद्योगाला चांगले भवितव्य
लालसिंग खालसा : आरमोरीत शेतकरी तांत्रिक प्रशिक्षण
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात रेशीम उद्योगाला अतिशय चांगले वातावरण असून रेशीम उद्योगातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा व विकासाचा मार्ग सापडू शकतो. शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध पद्धतीने रेशीम उद्योग केल्यास येथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी टसर रेशीम उद्योगाकडे आपले भवितव्य उज्ज्वल करणारा उद्योग म्हणून बघावे, असे मार्गदर्शन महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले.
जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरीच्या वतीने लाभार्थी सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी निवासी तांत्रिक प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन २० ते २६ जानेवारीदरम्यान जिल्हा रेशीम कार्यालयात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूरूचे सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. के. के. चॅटर्जी, रेशीम विकास अधिकारी गणेश राठोड, प्रा. जयेश पापडकर, प्रा. आर. एन. चव्हाण, प्रा. ममता भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
१६ ते २० जानेवारीपर्यंत ५० विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगाविषयी प्रशिक्षण देण्यात आले. रेशीम कार्यालयाचे क्षेत्रसहायक जी. सी. भैसारे यांनी विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगाविषयी प्रशिक्षण दिले. कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही शेतकऱ्यांनी स्वत: रेशीम उद्योग करण्याची इच्छा दर्शविली. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)