गोंडवानाच्या कुलसचिवांना महाविद्यालयाने बोलाविले परत

By Admin | Updated: August 13, 2016 01:49 IST2016-08-13T01:49:48+5:302016-08-13T01:49:48+5:30

गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांना विद्यापीठाच्या कुलसचिव पदावरून कार्यमुक्त करा ...

Gondwana's registrar was called back by the college | गोंडवानाच्या कुलसचिवांना महाविद्यालयाने बोलाविले परत

गोंडवानाच्या कुलसचिवांना महाविद्यालयाने बोलाविले परत

कार्यमुक्त करा : कुलगुरूंना दिले पत्र
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांना विद्यापीठाच्या कुलसचिव पदावरून कार्यमुक्त करा व त्यांना पारशिवणी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात परत पाठवा, असे पत्र विद्या शिक्षण प्रसारक मंडळाने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे आता डॉ. इरपाते यांना गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर राहण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे.
यासंदर्भात लोकमतने कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्याकडे विचारणा केली असता, आपण पारशिवणी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होतो. त्यावेळी आपली कुलसचिवपदावर प्रतिनियुक्ती झाली. संस्थेने आता आपली संस्थेला गरज असल्याचे पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे व आपल्याला कार्यमुक्त करून महाविद्यालयात परत पाठवावे, अशी विनंती केली आहे. आपण आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. संस्थेच्या पत्राच्या अनुषंगाने आपण कुलगुरूंना कार्यमुक्त करण्याबाबत विनंती पत्र दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. २० सप्टेंबर २०११ ला गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर इरपाते हे कुलसचिव पदावर नियुक्त झाले होते.
अद्याप गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी महाविद्यालय व डॉ. इरपाते या दोघांच्याही पत्रावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे. डॉ. इरपाते यांच्या काळात विद्यापीठात काही ठोस कामे झालीत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Gondwana's registrar was called back by the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.