गोंडवाना विद्यापीठाच्या भविष्यातील दिशा व आराखड्यावर होणार विचारमंथन
By Admin | Updated: January 17, 2017 00:43 IST2017-01-17T00:43:56+5:302017-01-17T00:43:56+5:30
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली याची निर्मिती आदिवासी बहूल भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या ...

गोंडवाना विद्यापीठाच्या भविष्यातील दिशा व आराखड्यावर होणार विचारमंथन
१८ जानेवारीला आयोजन : शैक्षणिक समुदाय मांडणार मत
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली याची निर्मिती आदिवासी बहूल भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून २०११ मध्ये करण्यात आली. या विद्यापीठाच्या भविष्यातील दिशा व आराखड्याची रूपरेषा निश्चित करण्यासाठी १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आॅबझरर्व्हर रिसर्च फाऊंडेशन मुंबईचे चेअरमन सुधिंद्र कुलकर्णी आपल्या चमूसह उपस्थित राहणार आहेत. ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेणार आहेत.
२७ सप्टेंबर २०११ ला अधिसूचना काढून गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली व विद्यापीठाने २ आॅक्टोबर २०११ पासून कामास सुरूवात केली. या विद्यापीठाच्या कायक्षेत्रात चंद्रपूर, गडचिरोली हे दोन जिल्हे येतात. विद्यापीठ अभिमत संस्था असून यामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य, तांत्रिक, व्यावसायिक अशा विविध विद्याशाखेमधून पदवी आणि स्थानोत्तर तसेच प्रमाणपत्र व पदविका शिक्षण दिल्या जाते. विद्यापीठाशी २३७ महाविद्यालय संलग्न आहेत. ६४ विविध शैक्षणिक अभ्यासक्रम येथे चालविले जातात. एक लाखावर विद्यार्थी प्रती वर्षी या अभ्यासक्रमाचा लाभ घेतात. विद्यापीठाचे रूपांतर एका राष्ट्रीय, जागतिकस्तरावर शैक्षणिक, संशोधन, विस्तार व व्यावसायिक क्षेष्ठत्व केंद्रात भविष्यकाळात करावयाचे आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाचा भविष्यकालीन परिसर विकासाचा उत्तम आराखडा तयार करावयाचा आहे. यामध्ये शिक्षण व संशोधनाच्या दृष्टीने सुविधा भौतिक सुविधा तसेच जिल्ह्यातील उपलब्ध साधनसंपत्तीवर आधारित नवीन व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम आदी बाबींचा समावेश आहे. शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावयाच्या प्रस्तावासंदर्भात शैक्षणिक सत्रामध्ये भरीव कामगिरी केलेले व अनेक विद्यापीठांना ज्या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केलेले सुधिंद्र कुलकर्णी या निमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.