गोंडवाना विद्यापीठाची भरती प्रक्रिया वांद्यात येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:47 IST2016-06-18T00:47:39+5:302016-06-18T00:47:39+5:30
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात गैरप्रकार

गोंडवाना विद्यापीठाची भरती प्रक्रिया वांद्यात येण्याची शक्यता
चौकशीची मागणी : मुलाखत समितीतील सदस्याचीच सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती
गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात गैरप्रकार व अनागोंदीची मालिका अद्यापही खंडीत झालेली नाही. अलिकडेच झालेल्या भरती प्रक्रियेबाबतही विविध आरोप, प्रत्यारोप दररोज होत असल्याने ही भरती प्रक्रिया वाद्यांत येण्याची शक्यता दिसत आहे. काही प्राध्यापक व शिक्षक संघटनांनी या भरती प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
गोंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकाची भरती प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेत अनेक पात्र उमेदवारांना डावलण्यात आले, ५५ टक्के गुण अपेक्षित असताना कमी टक्केवारी असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. तसेच भरती प्रक्रिया राबविताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे प्रकार आता उघडकीस आले आहे. इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले प्रा. डॉ. विवेक जोशी हे मुलाखत समितीचे सदस्य असताना त्यांनी स्वत:च मुलाखत दिली. मुलाखत देण्यापूर्वी त्यांनी या समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा का दिला नाही. हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या भरती प्रक्रियेचा पोळा आधीच फुटला. या संदर्भात अनेक माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. विद्यापीठाने निवड झालेल्या प्राध्यापकांची यादी घाईगडबडीत प्रसिध्द केली असून वेबसाईटवरही ती उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे जे प्रा.डॉ. जोशी मुलाखत समितीचे सदस्य होते, त्यांची मुलाखत घेऊन त्यांचीच नियुक्ती करण्याचे पुण्यकर्मही विद्यापीठाने पार पाडले आहे. जोशी हे इंग्रजी विषयाचे अधिष्ठाता असून व्यवस्थापन व विद्याशाखेचे सदस्यही आहेत. त्यामुळे मुलाखत समितीत त्यांचा समावेश होता, असे असताना त्यांनी मुलाखत दिली व त्यांची आपसुकच निवड झाली, असे दिसून येत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव हे दोघेही प्रक्रिया कायदेशीर झाल्याचे विविध माध्यमांना वारंवार सांगत असून कुलगुरूंनी तर कुणाला संशय असेल तर त्यांनी थेट पोलिसात तक्रार करावी किवां न्यायालयात जावे, असे थेट आवाहनच माध्यमांशी बोलताना दिले आहे. एकूणच या भरती प्रक्रियेनंतरही विद्यापीठाच्या गैरकारभाराचा ससेमिरा थांबलेला नाही. या पूर्वीही निर्मितीपासूनच गोंडवाना विद्यापीठ विविध कारणांनी गाजत राहिले आहे. ती परंपरा यावेळीही कायमच राहिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)