गोंडवाना विद्यापीठात एकच विद्यार्थी एकाच दिवशी देतात दोन पेपर
By Admin | Updated: April 24, 2016 01:28 IST2016-04-24T01:28:46+5:302016-04-24T01:28:46+5:30
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू झाल्या. परंतु परीक्षा लवकरच संपविण्याच्या घाईत परीक्षेच्या वेळापत्रकात प्रचंड घोळ करून ठेवला.

गोंडवाना विद्यापीठात एकच विद्यार्थी एकाच दिवशी देतात दोन पेपर
उन्हाचा तडाखा : वेळापत्रक तयार करण्यात घोळ
चामोर्शी : गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू झाल्या. परंतु परीक्षा लवकरच संपविण्याच्या घाईत परीक्षेच्या वेळापत्रकात प्रचंड घोळ करून ठेवला. एटीकेटी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना एकच विषयाचा सलग दोन वर्गाचा पेपर एकाच दिवशी द्यावा लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. ४५ अंशाच्या वर तापमानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता एटीकेटी व सेमिस्टर पध्दत सुरू केली. परंतु एटीकेटी व सेमिस्टर याचा सारासार विचार न करता गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे परीक्षा पत्रक तयार करून विद्यार्थ्यांचा वैताग वाढविला आहे. ४ एप्रिलला बीए तृतीय सहावे सेमिस्टर विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पेपर सकाळी ९.३० वाजता ठेवून त्याच सहाव्या सेमिस्टरच्या एटीकेटी असलेल्या इंग्रजी विषयाच्या पाचव्या सेमिस्टरचा पेपर दुपारी २ वाजता ठेवला होता. ६ एप्रिल २०१६ ला बीए प्रथमचा प्रथम सेमिस्टरचा मराठीचा पेपर सकाळी ९.३० वाजता तर त्याच फॅकल्टीत एटीकेटी विद्यार्थ्यांचा दुसऱ्या सेमिस्टरचा मराठीचा पेपर दुपारी २ वाजता ठेवण्यात आला. ७ एप्रिल २०१२ ला बीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा तिसऱ्या सेमिस्टरचा मराठी विषयाचा पेपर सकाळी ९.३० वाजता तर एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांचा चौथ्या सेमिस्टरचा मराठीचा पेपर दुपारी २ वाजता होता. १६ एप्रिल २०१६ ला बीए तृतीयच्या विद्यार्थ्यांचा इतिहासाचा चौथ्या सेमिस्टरचा पेपर सकाळी ९ वाजता तर एटीकेटी असलेल्या त्याच विद्यार्थ्यांचा पाचव्या सेमिस्टरचा पेपर दुपारी २ वाजता घेण्यात आला. तसेच २० एप्रिल २०१६ ला बीए तृतीयच्या विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्राचा सहाव्या सेमिस्टरचा पेपर सकाळी ९ वाजता तर एटीकेटी असलेल्या त्याच विद्यार्थ्यांचा पाचव्या सेमिस्टचा पेपर दुपारी २ वाजता होता. २२ एप्रिल २०१६ ला बीए तृतीयच्या मराठी वाड्मयचा सहाव्या सेमिस्टरचा पेपर सकाळी ९ वाजता तर एटीकेटी असलेल्या त्याच विद्यार्थ्यांचा पाचव्या सेमिस्टरचा पेपर दुपारी २ वाजता होता. अशा वेळापत्रकामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सकाळी ७ वाजता बाहेर पडून रात्री ९ ते १० वाजेपर्यंत घरी पोहोचत होते. भर उन्हात उपाशापोटी राहावे लागले. (तालुका प्रतिनिधी)
विज्ञान शाखेच्याही विद्यार्थ्यांना फटका
कला शाखेच्या वेळापत्रकात गोंधळ उडाला. अशीच अवस्था बीएससीच्या विद्यार्थ्यांची झाली. ९ एप्रिल २०१६ ला बीएससी द्वितीयचा रसायनशास्त्राचा दुसऱ्या सेमिस्टरचा पेपर सकाळी ९ वाजता व तर एटीकेटी असलेल्या त्याच विद्यार्थ्यांचा प्रथम सेमिस्टरचा पेपर दुपारी २ वाजता झाला. ११ एप्रिल २०१६ ला प्राणीशास्त्र विषयाचा बीएससी तृतीय या पाचव्या सेमिस्टरचा पेपर सकाळी ९.३० वाजता तर एटीकेटी असलेल्या त्याच विद्यार्थ्यांचा सहाव्या सेमिस्टरचा पेपर दुपारी २ वाजता झाला. १६ एप्रिल २०१६ ला बीएससी तृतीय विद्यार्थ्यांचा भौतिकशास्त्र विषयाचा पाचव्या सेमिस्टरचा पेपर सकाळी ९.३० वाजता तर त्याच विद्यार्थ्यांचा सहाव्या सेमिस्टरचा पेपर दुपारी २ वाजता झाला.