देवींचे विसर्जन झाले; स्वच्छतेचे काय?
By Admin | Updated: October 7, 2014 23:34 IST2014-10-07T23:34:16+5:302014-10-07T23:34:16+5:30
नवरात्र दरम्यान शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शेकडो दुर्गा व शारदांचे चंद्रपूर मार्गावर असलेल्या तलावात विसर्जन करण्यात आले. यामुळे तलावात प्रचंड घाण पसरली असून यामुळे

देवींचे विसर्जन झाले; स्वच्छतेचे काय?
गडचिरोली : नवरात्र दरम्यान शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शेकडो दुर्गा व शारदांचे चंद्रपूर मार्गावर असलेल्या तलावात विसर्जन करण्यात आले. यामुळे तलावात प्रचंड घाण पसरली असून यामुळे तलावाचे पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
गडचिरोली शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यादरम्यान खासगी व सार्वजनिक मंडळाच्या मिळून शेकडो शारदा व दुर्गाची प्रतिष्ठापणा करण्यात येते. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्यावतीने लाखो रूपयांची विद्युत रोषणाई केली जाते. त्याचबरोबर भाविकांना आपल्या मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी नऊ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो नागरिक दरदिवशी येत असल्याने शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा त्यानंतर दुर्गा व शारदेचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात येते.
चंद्रपूर मार्गावर बाजारानजीक असलेला तलाव शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील देवींचे याच तलावात विसर्जन करण्यात येते. नऊ दिवसांच्या पूजेनंतरचे निर्माल्य येथील पाण्यामध्ये टाकले जाते. देवी ठेवण्यासाठी बनविण्यात आलेल्या लाकडी पाट्याही पाण्यामध्ये टाकल्या जातात. यामुळे या तलावातील पाणी गढूळ झाले असून पाण्याला दुर्गंधीयुक्त वास यायला लागला आहे. तलावाच्या चारही बाजूला वस्ती आहे. या दुर्गंधीचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागतो. विशेष करून ज्या ठिकाणी देवीदेवतांचे विसर्जन केले जाते. त्या सभोवतालच्या नागरिकांना याचा त्रास अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. याबद्दल येथील नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर तलावाची तत्काळ सफाई करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)