गोदावरी पुलावरील वाहतूक राहणार बंद
By Admin | Updated: March 6, 2017 00:38 IST2017-03-06T00:38:27+5:302017-03-06T00:38:27+5:30
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात आला.

गोदावरी पुलावरील वाहतूक राहणार बंद
आजपासून तीन दिवस : वाहनाची स्पॅन लोड टेस्टिंग होणार
सिरोंचा : महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात आला. या पुलाचे उद्घाटन महिनाभरापूर्वी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र अद्यापही या पुलावर वाहनांचे लोड टेस्टिंग करण्यात येत नव्हते. परिणामी या पुलावरून दररोज शेकडो ओव्हरलोड ट्रकांची वाहतूक सुरू होती. लोड टेस्टिंगची मागणी जोर धरू लागल्याने आता सोमवारपासून या पुलावर स्पॅन लोड टेस्टिंगचे काम होणार आहे. परिणामी तीन दिवस या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
६ ते ८ मार्च या कालावधीत तीन दिवस गोदावरी पुलावरील वाहनांची लोड टेस्टिंग करण्यात येणार आहे. ८ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर पुलावरून वाहतूक बंद राहिल. तपासणी मोहिमेदरम्यान मोठे व लहान वाहनांच्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येणार आहे. या कार्यवाही संदर्भात उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिरोंचा यांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.
हैदराबादवरून येईल चमू
गोदावरी नदीच्या पुलावरील लोड टेस्टिंगसाठी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून विशेष टीम येणार आहे. सदर माहिती विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम व शाखा अभियंता एजाज सय्यद यांनी दिली आहे. लोड टेस्टिंगदरम्यान तेलंगणा व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील पुलाच्या काठावर बॅरीकेट लावण्यात येणार असून येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.