कलादालनाचे वैभव हरपले

By Admin | Updated: October 7, 2015 02:29 IST2015-10-07T02:29:37+5:302015-10-07T02:29:37+5:30

मानव विकास मिशनच्या निधीतून शहरातील पोटेगाव मार्गावर तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस २००९ साली गोंडवन कलादालन उभारण्यात आले.

The glory of Kaladalna is lost | कलादालनाचे वैभव हरपले

कलादालनाचे वैभव हरपले

देखाव्यांवर पसरले जाळे : सहा वर्षांपासून रंगरंगोटी नाही; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
गडचिरोली : मानव विकास मिशनच्या निधीतून शहरातील पोटेगाव मार्गावर तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस २००९ साली गोंडवन कलादालन उभारण्यात आले. मात्र या कलादालनाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कलादालनाचे जुने वैभव हरपले आहे. येथील संग्रहित वस्तूंवर जाळे व धूळ जमा झाली आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी निरंजनकुमार सुदांशू यांच्या काळात मानव विकास मिशनच्या निधीतून गोंडवाना आदिवासी संग्रहालय व तथा कलादालनाची भव्य इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे अतुल पाटणे जिल्हाधिकारी असताना तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तळमजल्यावर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीशी संबंधित विविध वस्तू काचांच्या आलमारीमध्ये पॅक करून ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलामध्ये आढळणाऱ्या वस्तूही याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकप्रकारे गोंडवन कला दालनातील वस्तूंच्या माध्यमातून आदिवासींची संस्कृती व गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीचे वैभव बघायला मिळते. संग्रहालयातील विशेष रचनेवर लाखो रूपये खर्च करण्यात आले आहेत. सदर वस्तू काचाच्या आलमाऱ्यांमध्ये बंदस्थितीत असल्या तरी त्यांच्यावर काही प्रमाणात धूळ जमा झाली आहे. त्याचबरोबर जाळेही पसरले आहेत. येथील कर्मचारी साफसफाई करीत असले तरी ते फक्त बाहेरूनच साफसफाई करू शकतात. येथील वस्तूंना व्यवस्थित धुणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मागील सहा वर्षांच्या कालावधीत एकदाही इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्यामुळे इमारतींवरील रंग निघून गेला आहे. एवढेच नाही तर या इमारतीवर लिहिलेले गोंडवन कला दालन असे नाव सुद्धा मिटण्याच्या स्थितीत पोहोचले आहे.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सभागृह आहे. या सभागृहाचे दर दिवसाचे भाडे तीन ते चार हजार रूपये आकारले जाते. विविध संघटना व खासगी व्यक्ती या ठिकाणी कार्यक्रम घेतात. त्यामुळे वर्षातून पाच ते सहा लाख रूपयांचे उत्पन्न सहज प्राप्त होते. कला दालनाच्या देखरेखीसाठी दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्या वेतनावर वर्षाचे एक ते दीड लाख रूपये खर्च होत असले तरी उर्वरित उत्पन्नातून रंगरंगोटी व संग्रहालयातील इतर वस्तूंची देखभाल करणे सहज शक्य आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर इमारतीच्या देखभालीकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)

संग्रहालयाकडे प्रेक्षकांची पाठ

संग्रहालयात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी वापरत असलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या वस्तूंच्या प्रतिकृती नसून प्रत्यक्ष वस्तूच ठेवल्या आहेत. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचे दर्शन संग्रहालयाच्या माध्यमातून घडण्यास मदत होते. त्याचबरोबर जंगलात आढळणाऱ्या वस्तूही या ठिकाणी आहेत. संग्रहालयात प्रवेश करण्यासाठी केवळ पाच रूपये शुल्क आकारण्यात येते. या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक संग्रहालयाला भेट देऊ शकला असता, त्याच्या माध्यमातून कलादालनाला उत्पन्नही मिळाले असते. मात्र येथील वस्तूंची दुर्दशा बघून प्रेक्षक संग्रहालयात जाण्यास तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The glory of Kaladalna is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.