कोरची तालुक्यासाठी झटणाऱ्यांचा गौरव
By Admin | Updated: February 3, 2016 01:41 IST2016-02-03T01:41:46+5:302016-02-03T01:41:46+5:30
कोरची हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मागास तालुका आहे. तरीही काही नागरिक व अधिकारी या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.

कोरची तालुक्यासाठी झटणाऱ्यांचा गौरव
विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश : १० नागरिक तालुका गौरव पुरस्काराने सन्मानित; मित्रांगण मंचचा उपक्रम
कोरची : कोरची हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मागास तालुका आहे. तरीही काही नागरिक व अधिकारी या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव मित्रांगण मंचच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. यामध्ये दहा व्यक्तींना तालुका गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. निमसरकार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. विजय वानखेडे, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, तहसीलदार विजय बोरूले, पोलीस अधिकारी हृषीकेश घाडगे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह तालुक्यातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिलांचे सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या कुमारीनबाई जमकातन यांना ‘महाराष्ट्राची कन्या’ पुरस्काराने २०१० साली सन्मानित केले होते. त्यांचे कार्य अजूनही सुरू आहे. त्यामुळे त्यांना ‘तालुका गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तालुका गौरव पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या इतर मान्यवरांमध्ये बँक आॅफ इंडियाचे शाखा अधिकारी गुलमोहम्मद हुसैन, डॉ. राजकुमार कोरेटी, सुदराम झाडू राऊत रा. बेतकाटी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिशूपाल कुमरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अब्दुल्ला रहीमखॉ पठाण, मनिषा मुरलीधर जेऊमल, अंजली गोवर्धन नैताम, अनिल मुलचंद टेंभुर्णे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य देवराव गजभिये, संचालन प्रा. वसंत बांगरे, किशोर साखरे तर आभार नंदकिशोर वैरागडे यांनी मानले. गौरव झालेल्यांमध्ये सुधराम राऊत हे सिंचनाची सुविधा नसतानाही अत्यंत मेहनतीच्या भरवशावर खरीप व रबी पीके घेतात. त्यामुळे कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. (तालुका प्रतिनिधी)