भामरागडमधील मोहलाडूंना मिळणार जागतिक बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:55 IST2018-10-27T23:53:26+5:302018-10-27T23:55:30+5:30
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत शेकडो बचत गटांकडून विविध वनोपजांपासून खाद्य पदार्थ आणि इतर दर्जेदार वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र बाजारपेठेअभावी त्यांच्या कलागुणांचे आणि मेहनतीला योग्य मोल होत नाही.

भामरागडमधील मोहलाडूंना मिळणार जागतिक बाजारपेठ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत शेकडो बचत गटांकडून विविध वनोपजांपासून खाद्य पदार्थ आणि इतर दर्जेदार वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र बाजारपेठेअभावी त्यांच्या कलागुणांचे आणि मेहनतीला योग्य मोल होत नाही. पण आता थेट अॅमेझॉन या मार्केटिंग कंपनीशी करार करून महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) बचत गटांच्या या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली आहे. त्यामुळे भामरागडमधील मोहफुलांपासून बनविलेल्या पौष्टिक लाडूंना आता देशातच नाही तर जगातूनही मागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात वनोपज मोठ्या प्रमाणावर आहे. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक ते वनोपज गोळा करून आपली गुजराण करतात. मोहफूल वेचून त्याची विक्री करणे हा आदिवासी लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्या मोहफुलांपासून अनेक लोक अवैधपणे मद्यनिर्मिती करतात. परंतू माविमच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनातून बचत गटाने भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे सुरू केलेल्या लाडू प्रकल्पात मोहफुलांपासून पौष्टिक लाडू तयार केले जात आहे.
त्रिवेणीसंगम लोक संचालित साधन केंद्र भामरागडद्वारे निर्मित बचत गटाच्या वतीने हा लाडू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. त्या मोहफुलाच्या लाडूंना जाणकारांकडून मागणी असली तरी भौगोलिक स्थिती आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे बचत गटाचा हा व्यवसाय मर्यादित राहिला. आता अॅमेझॉनशी झालेल्या करारामुळे मोहा लाडूसह इतरही उत्पादनांचा विस्तार होईल, अशी आशा वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्राम यांनी व्यक्त केली.
हस्तकलेच्या वस्तूही मिळणार
अॅमेझॉनच्या सहेली कॉर्नरवरून सदर मोहा लाडू ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत. यासोबतच दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू आणि हस्तकलेच्या वस्तूंचाही समावेश राहणार आहे. वस्तूंची नोंद केल्यानंतर एका क्लिकवर माविम जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.