महिलेला हक्काचा निवारा द्या!
By Admin | Updated: February 9, 2017 01:43 IST2017-02-09T01:43:04+5:302017-02-09T01:43:04+5:30
शासकीय घरकूल योजनेंतर्गत मंजूर होऊन बांधकाम पूर्ण झालेल्या घरावर अन्य महिलेने अनधिकृतरित्या ताबा घेऊन घर बळकाविले.

महिलेला हक्काचा निवारा द्या!
तहसीलदारांचे निर्देश : लोकमतच्या वृत्ताची दखल
सिरोंचा : शासकीय घरकूल योजनेंतर्गत मंजूर होऊन बांधकाम पूर्ण झालेल्या घरावर अन्य महिलेने अनधिकृतरित्या ताबा घेऊन घर बळकाविले. त्यामुळे बेघर झालेल्या सिरोंचा मालगुजारी क्षेत्रातील लक्ष्मी व्यंकटेश कुंदारपू या निराधार महिलेने तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून अन्यायग्रस्त महिलेला हक्काचा निवारा मिळवून देण्यास सांगितले आहे. शिवाय केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महसूल विभागाला अवगत करण्यासही सूचित केले आहे.
लक्ष्मी कुंदारपू यांचे पती व्यंकटेश किष्टय्या कुंदारपू हयात असताना १९९७ मध्ये आर्थिदकृष्ट्या दुर्बल घटक योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सभापती, सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांच्या समक्ष घराचा ताबा दिला तेव्हापासून कुंदारपू कुुटुंब सलगपणे या घरात वास्तव्यास होते. दरम्यान लक्ष्मी कुंदारपू यांचे पती व्यंकटेश यांचे निधन झाले. उपजीविकेसाठी लहान मुलांसह लक्ष्मी माहेरी निघून गेली. तिच्या गैरहजेरीत तेलंगणा राज्यातील जयश्री तिरूपती रौतू या दुसऱ्या महिलेने संबंधित घरावर अवैधरित्या कब्जा केला. सुरूवातीला एक ते दोनदा जयश्रीने घरावरील ताबा सोडत असल्याचे सांगितले होते. परंतु काही कालावधीनंतर तिने घरावरील ताबा सोडण्यास नकार दिला होता. याबाबत लक्ष्मीने आक्षेप घेऊन घर रिकामे करण्यास सांगितले असता, जयश्रीने घर सोडण्यास नकार दिला. लक्ष्मी व लहान मुले स्वत:च्या निवाऱ्यापासून वंचित आहेत.
शासकीय घराचा गृहकर, नमुना आठ, पाणीकर, रेशनकार्डसह कायम वास्तव्याचा पत्ता अद्यापही लक्ष्मी व्यंकटेश कुंदारपू यांच्याच नावे आहे. याबाबत लोकमतने २९ डिसेंबर २०१६ ला वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल तहसीलदार व तालुका दंडाधिकारी अशोक कुमरे यांनी घेतली. कुमरे यांनी सिरोंचा नगर पंचायतीला पत्र पाठवून अन्यायग्रस्त महिलेला तिचे स्वत:चे घर उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले आहे. (तालुका प्रतिनिधी)