स्थायी ग्रामसेवक द्या; अन्यथा कुलूप ठोकू
By Admin | Updated: August 21, 2015 01:58 IST2015-08-21T01:58:33+5:302015-08-21T01:58:33+5:30
तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या बोरी ग्राम पंचायतमध्ये मागील अनेक दिवसांपासून ग्रामसेवक नाही. त्यामुळे गावाचा विकास रखडला आहे.

स्थायी ग्रामसेवक द्या; अन्यथा कुलूप ठोकू
बोरीवासियांचा इशारा : दाखल्यांसाठी अडचण
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या बोरी ग्राम पंचायतमध्ये मागील अनेक दिवसांपासून ग्रामसेवक नाही. त्यामुळे गावाचा विकास रखडला आहे. त्याचबरोबर नागरिकांना दाखले घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे बोरी ग्राम पंचायतीत तत्काळ स्थायी ग्रामसेवकाची नेमणूक करावी, अन्यथा ग्राम पंचायतीला कुलूप ठोकू असा इशारा बोरी येथील नागरिकांनी दिला आहे.
बोरी गावाची लोकसंख्या जवळपास १ हजार ५०० एवढी आहे. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत नवीन कार्यकारिणी ग्राम पंचायतीचा कारभार सांभाळत आहे. ग्राम पंचायतीच्या वेळी या ठिकाणी ग्रामसेविका म्हणून हर्षराणी निमसरकार या कार्यरत होत्या. मात्र त्यांचे काही दिवसांपासून महागाव येथे स्थानांतरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या ग्रामसेवकाची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली नाही. ग्रामसेवक नसल्याने विविध विकास कामांचा लाखो रूपयांचा निधी खर्चाविना पडून आहे. शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक विविध दाखल्यांसाठी ग्राम पंचायतीत जात आहेत. मात्र ग्रामसेवक नसल्याने अडचण होत आहे.
१५ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामसेवकाची नियुक्ती तत्काळ करावी, अशी मागणी करण्यात आली. सदर बाब बीडीओ तडस यांच्याही लक्षात आणून दिली. सात दिवसांच्या आत ग्रामसेवकाची नियुक्ती न केल्यास ग्राम पंचायतीलाच कुलूप ठोकण्याचा इशारा पराग ओल्लालवार, साईनाथ गड्डमवार, राजू पैडीवार, भीमराव कमटेलवार, नरेश आत्राम, अनिल किरमिरवार, विलास जम्पलवार, लालशाही मडावी यांनी केली आहे.