कोरची तालुक्याला अधिकच्या विहिरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:01+5:302021-05-09T04:38:01+5:30

कोरची : तालुक्यात सिंचनाच्या सोयी अजूनही उपलब्ध नाही. मोठे तलाव बांधण्यात आले नाही. शासनाने जिल्ह्याला सिंचन विहिरी मंजूर ...

Give more wells to Korchi taluka | कोरची तालुक्याला अधिकच्या विहिरी द्या

कोरची तालुक्याला अधिकच्या विहिरी द्या

कोरची : तालुक्यात सिंचनाच्या सोयी अजूनही उपलब्ध नाही. मोठे तलाव बांधण्यात आले नाही. शासनाने जिल्ह्याला सिंचन विहिरी मंजूर केल्या आहेत. या विहिरींचे वितरण करताना कोरची तालुक्याला प्राधान्य द्यावे.

गंजलेल्या विद्युत खांबाचा धोका

सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे.

खुल्या जागांमुळे दुर्गंधी

गडचिरोली : न. प. प्रशासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून वाॅर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट लावले. मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे.

एमआयडीसी रखडली

अहेरी : येथे नऊ एकरात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. काहींना येथे भूखंड आवंटीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र औद्योगिक वसाहतीचे काम सध्या रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे.

घरांची दुरवस्था कायम

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. या घरांमध्ये राहणे ही कठीण झाले आहे.

एटापल्ली तालुक्यातील सौर दिवे नादुरूस्त

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौर दिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौर दिवे निकामी झाले आहेत.

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जाते. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांना ही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.

सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा

सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडी करिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब फायदेशीर राहणार आहे.

औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज

धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.

कुरखेडातील गावांना लाईनमनच नाही

कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राईस मिल, आटा चक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावात लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.

आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

पन्न्या टाकणाऱ्यांवर कारवाई नाही

देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. येथील राजेंद्र वॉर्ड, माता वॉर्ड व गांधी वॉर्डातील अनेकजण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लास्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. नाल्यांमध्ये प्लास्टिक व पन्न्या टाकल्या जात असल्याने सांडपाणी निचरा हाेण्याचा मार्ग बंद झाला आहे. कारवाईची नितांत गरज आहे.

रेपनपल्ली मार्गावरील पूल कालबाह्य

कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूल सुध्दा जीर्ण अवस्थेत आहे. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी राहते. वेळोवेळी वाहतूक खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

कंटेनर सभोेवतालचा कचरा उचला

गडचिरोली : घरून गोळा केलेला कचरा घंटागाडी चालक जवळपासच्या कचरा कंटेनरमध्ये नेऊन टाकतात. मात्र टाकते वेळी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने अर्धा कचरा खाली पडतो. सदर कचरा वादळामुळे नागरिकांच्या दारापर्यंत उडत जाते. या कचऱ्यावर दिवसभर डुकरांचा हैदोस राहतो. कंटेनरमध्ये कचरा व्यवस्थित टाकण्याची मागणी आहे.

विद्युत तारांवरील फांद्यांची कटाई करा

अहेरी : रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब आहेत. रस्त्याच्या बाजूला झाडे सुद्धा आहेत. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्याच बरोेबर एखादी दुर्घटना सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत तारांवरील फांद्या तोडण्याची मागणी आहे.

टाकीत साचतेय अशुद्ध पाणी

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.

कैकाडी वस्ती साेयी सुविधांपासून वंचित

गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वस्तीतील नागरिक नगरपालिकेचे मतदार आहेत.

उघड्यावरील खाद्य पदार्थांकडे दुर्लक्ष

गडचिरोली : अनेक तालुका मुख्यालयाच्या उपहार गृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

वयोवृध्दांना तीन हजार रूपये पेन्शन द्या

आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृध्द ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर प्रती महिना तीन हजार रूपये वृध्दापकालीन अर्थसहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

चतुर्थ श्रेणी दर्जा पासून कोतवाल वंचित

आष्टी : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील साजा अंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा

देसाईगंज : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी होत आहे. हस्तलिखित सातबारे बंद केल्याने शेतकऱ्यांना सेतू केंद्राचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यात त्यांची आर्थिक लूट केली जात आहे.

रेगडी-कसनसूर मार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा

घोट : रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर किरकाेळ अपघात वाढले आहेत. भविष्यात गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

धानोरा : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असताना ही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाही. त्यामुळे कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. तालुक्याच्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना कामाशिवाय परतावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सुद्धा साेसावा लागताे.

Web Title: Give more wells to Korchi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.