अनुकंपाधारकांना नोकरी द्या
By Admin | Updated: May 14, 2017 01:49 IST2017-05-14T01:49:27+5:302017-05-14T01:49:27+5:30
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकासप्रकल्प तसेच अन्य विभागात कार्यरत असताना

अनुकंपाधारकांना नोकरी द्या
मुख्यमंत्र्यांकडे मागणी : १० टक्के पदभरतीची मर्यादा रद्द करा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकासप्रकल्प तसेच अन्य विभागात कार्यरत असताना सेवा कर्तव्य पार पाडत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसदारास अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे त्यांना लवकर अनुकंपा तत्वावर नोकरी देवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यात यावी, तसेच प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील रिक्त पदांच्या १० टक्के पदभरतीची मर्यादा रद्द करण्यात यावी, अशी मागणी अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना एक विशेष बाब म्हणून शासकीय सेवेतील एकूण गट क आणि ड च्या रिक्त असलेल्या जागेवर १०० टक्के पदे अनुकंपा तत्वावर भरण्यात यावी, जिल्ह्यातील अनुकंपाधारकांकरिता पेसा कायद्याची अट शिथील करण्यात यावी, अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ज्या अनुकंपाधारकांचे वय ४५ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा अनुकंपाधारकांचे वय वाढवून ४८ वर्षे करण्यात यावे, त्यांच्या कुटुंबातील एका वारसदारास विनाअट शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, राज्य शासकीय सेवेत पती, पत्नी कार्यरत असताना यापैकी एखादा कर्मचारी दिवंगत झाल्यास त्याच्या कुटूंबातील एका वारसदारास विनाअट अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी, राज्य शासकीय सेवेत कार्यरत असतांना दिवंगत झालेल्या कुटुंबातील एका वारसदारास अनुकंपा तत्वावर शासकीय कर्मचाऱ्याच्या दिवंगतीच्या दुसऱ्या दिवशी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.