एटापल्लीतच द्या लोह प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 01:33 IST2016-04-20T01:33:27+5:302016-04-20T01:33:27+5:30

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोहखनिज प्रकल्पाबाबत त्या भागातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली.

Give Iron Plant at Atapally | एटापल्लीतच द्या लोह प्रकल्प

एटापल्लीतच द्या लोह प्रकल्प

शेकडो नागरिक उपस्थित : तालुक्यातील जनतेची जनसुनावणीत मागणी
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोहखनिज प्रकल्पाबाबत त्या भागातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, खनिकर्म अधिकारी ओंकारसिंह भोंड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, एटापल्लीच्या नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, पं.स. सभापती दीपक फुलसंगे, विनोद आकनपल्लीवार, बाबुराव गंप्पावार, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, एम. सी. रच्चा आदी मंचावर उपस्थित होते.
दुपारी १२.४५ वाजता या जनसुनावणीला प्रारंभ झाला. त्यावेळी एटापल्ली येथील वयोवृध्द महिला व शिवसेनेच्या कार्यकर्त्या रेणुका शेंडे यांनी हा प्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारावा, अशी मागणी केली तर जनहितवादी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी कंपनीने सर्व नियमांचे उल्लंघन करून कामे सुरू केली आहे. प्रकल्प झाल्यास मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट होऊन वनापासून वर्षानुवर्ष मिळणारा रोजगार हिरावला जाईल. सीआरपीएफच्या कंपन्या आणून येथून कच्चा माल नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे बटालियन आणू नये, प्रकल्प तालुक्यातच उभारावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर यांनी तालुक्यात प्रकल्पाचे काम सुरू असून तहसीलदारांना माहिती नाही. शासन नागरिकांना अंधारात ठेवत आहे, असा आक्षेप घेतला. यावेळी नागरिकांमध्ये बसलेले माजी आमदार दीपक आत्राम यांनी जनसुनावणी करताना आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील जनतेला माहिती देणे आवश्यक होते. परंतु तसे न करता एक दिवसाच्या आधी माहिती देण्यात आली. जनसुनावणीत तालुक्यातील नागरिक आले नाही. ही जनसुनावणी नियमबाह्य आहे. ती रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी केली. तसेच पालकमंत्री गेले तरी कुठे? असा प्रश्न त्यांनी केला. सुरजागडबद्दल मागील एक महिन्यांपासून वाद सुरू असून पालकमंत्र्यांनी साधे एक विधानही केले नाही, असा आरोप दीपक आत्राम यांनी केला.
माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी हा प्रकल्प एटापल्ली तालुक्यातच व्हावा, अशी ठाम भूमिका मांडली. तसे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा सरकारला दिला. अभय पुण्यमूर्तीवार, प्रज्वल नागुलवार, महेश पुल्लूरवार आदींसह इतरांनीही हा प्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभा झाला पाहिजे, अशी मागणी केली.
प्रकल्प उभारण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. जागा उपलब्ध झाल्यास प्रकल्प उभारण्यास काहीच अडचण नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही, असे खासदार अशोक नेते यांनी यावेळी सांगितले. प्रकल्प तालुक्यातच व्हावा, अशी मागणी जनतेने केली. याबाबत मात्र ठोस आश्वासन जनसुनावणीतून मिळाले नाही. (तालुका प्रतिनिधी)


सुरजागड प्रकल्प पूर्वीच्याच सरकारची देणं - अशोक नेते
पूर्वीच्या सरकारने सुरजागड पहाडीवर कंपन्यांना लीज दिली आहे. आम्ही प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यामुळे आता कुठे प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. परंतु यामध्ये अनेकजण राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही, याची हमी मी देतो, असे खासदार अशोक नेते यांनी एटापल्ली येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकल्पाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. तालुक्यात जागा मिळाली तर तेथेच प्रकल्प उभारू, असेही त्यांनी सांगितले. कच्चा माल नेणे थांबविणे शक्य नाही. शासनाने लीज विकत दिल्याने कच्चे लोह दगडाची वाहतूक बंद करता येणार नाही, असेही खासदार नेते यावेळी म्हणाले.

उपोषण सुटले

लोह कारखाना एटापल्ली तालुक्यात निर्माण करण्याकरिता जागा शोधण्याचे काम करावे, अशी सूचना खासदार अशोक नेते यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार यांना केली. याशिवाय लोहखनिजाची वाहतूक बंद करण्याबाबत केंद्रस्तरावर चर्चा करून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खासदार नेते यांनी दिल्यामुळे एटापल्ली येथे सुरू असलेले सुरजागड बचाव संघर्ष समितीच्या उपोषणकर्त्यांनी मंगळवारी खासदारांच्या उपस्थितीत लिंबू शरबत पिऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी शशांक नामेवार, संपत्ती पैडाकुलवार, राहूल आदे, बादल मुजूमदार, सचिन खांदेकर यांना खासदारांनी निंबू सरबत पाजले. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा समितीचे संयोजक सुरेश बारसागडे यांनी दिला आहे.

माजी आमदारांची बारसागडेसोबत शाब्दिक खडाजंगी
सुरजागड बचाव संघर्ष समितीचे संयोजक सुरेश बारसागडे बोलत असताना माजी आमदार दीपक आत्राम यांनी हा माणूस कंपनीचा माणूस आहे, कंपनीच्या बाजुने बोलत आहे, यावरून आक्षेप घेतला. त्यांच्या या विधानानंतर बारसागडे व दीपक आत्राम यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटवून पुन्हा चर्चेला सुरूवात झाली. त्यानंतर माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम व बारसागडे यांच्यात शाब्दिक वाद झाले. अखेरीस ३.१५ वाजताच्या सुमारास धर्मरावबाबा आत्राम व दीपक आत्राम जनसुनावणीच्या स्थळावरून निघून गेलेत. त्यानंतर एटापल्लीत काही काळ जनसुनावणी चालली.

Web Title: Give Iron Plant at Atapally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.