कुरखेडाला मुख्याधिकारी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:28 IST2017-09-22T00:28:22+5:302017-09-22T00:28:38+5:30
कुरखेडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मागील सहा महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीची विकास कामे रखडली आहेत.

कुरखेडाला मुख्याधिकारी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मागील सहा महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीची विकास कामे रखडली आहेत. कुरखेडा नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायत गटनेते नागेश्वर फाये यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कुरखेडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून भूजबळ यांना नियुक्ती देण्यात आली होती. ते मागील सहा महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. कुरखेडा नगर पंचायतीचा प्रभार सद्य:स्थितीत देसाईगंजचे मुख्याधिकारी मुलानी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देसाईगंज ही मोठी नगर परिषद आहे. या नगर परिषदेचा कारभार सांभाळून कुरखेडा नगर पंचायतीकडे लक्ष द्यावे लागते. वेळेवर मुख्याधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना दाखले मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. मुख्याधिकारी नसल्याने कर्मचाºयांवरही नियंत्रण राहिलेले नाही. या सर्व अडचणी लक्षात घेता कुरखेडा येथे स्थायी मुख्याधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. निवेदन देतेवेळी खा. अशोक नेते, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक उमेश वालदे, रामहरी उगले, नगरसेविका स्वाती नंदनवार, नंदिनी दखणे, अर्चना वालदे उपस्थित होते.