पेसा व वनाधिकार कायद्यान्वये सामूहिक पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:27 IST2018-02-12T23:27:19+5:302018-02-12T23:27:36+5:30
पेसा व वनाधिकार कायद्यान्वये सामूहिक वनहक्क पट्टे मिळण्याच्या विषयाबाबत शनिवारी अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे पेरमिली इलाक्याच्या पारंपरिक पट्टीची बैठक ग्रामसभांतर्फे घेण्यात आली.

पेसा व वनाधिकार कायद्यान्वये सामूहिक पट्टे द्या
आॅनलाईन लोकमत
गुड्डीगुडम : पेसा व वनाधिकार कायद्यान्वये सामूहिक वनहक्क पट्टे मिळण्याच्या विषयाबाबत शनिवारी अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे पेरमिली इलाक्याच्या पारंपरिक पट्टीची बैठक ग्रामसभांतर्फे घेण्यात आली. यामध्ये ७५ ग्रामसभांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून सामूहिक पट्टे तत्काळ देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. व याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुड्डीगुडमचे सरपंच महेश मडावी होते. तसेच येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, संबय्या करपेत, कमलापूरचे उपसरपंच शंकर आत्राम, भगवान मडावी, बाजीराव तलांडी, नारायण आत्राम, विजा गावडे, लक्ष्मण मडावी यांच्यासह पेरमिली, राजाराम, कमलापूर, दामरंचा क्षेत्रातील प्रत्येक गावातील भूमिया, गयता व शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.
सदर बैठकीत पेरमिली इलाक्याची समिती गठित करण्यात आली. यामध्ये ५१ लोकांचा समावेश असून महिलांना ५० टक्के स्थान देण्यात आले. त्यानंतर सामूहिक दावे सादर करण्यासाठी लागणारी दस्तावेज जमा करून सामूहिक दाव्याचे कोरे अर्ज वाटप करण्यात आले.