गडचिरोलीत शिक्षण मंडळ द्या

By Admin | Updated: November 21, 2015 01:55 IST2015-11-21T01:55:24+5:302015-11-21T01:55:24+5:30

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभाजन करून गडचिरोली येथे पूर्व विदर्भासाठी नवे शिक्षण मंडळ (बोर्ड) सुरू करण्यात यावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटना ...

Give Gadchiroli Education Board | गडचिरोलीत शिक्षण मंडळ द्या

गडचिरोलीत शिक्षण मंडळ द्या

शिक्षक संघटना आग्रही : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभाजन रखडले
गडचिरोली : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभाजन करून गडचिरोली येथे पूर्व विदर्भासाठी नवे शिक्षण मंडळ (बोर्ड) सुरू करण्यात यावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटना मागील १० वर्षांपासून राज्य सरकारकडे करीत आहेत. मात्र राज्य सरकार या प्रश्नावर वेळकाढूपणा करीत असल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे.
राज्यात सध्या १० विभागीय शिक्षण मंडळ आहे. विदर्भात नागपूर, अकोला हे दोन विभागीय शिक्षण मंडळ आहे. याअंतर्गत जवळजवळ ११ जिल्ह्यांचा कारभार चालतो. नागपूर विभागीय शिक्षण मंडळात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे येतात. तर अकोला शिक्षण मंडळात अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती हे जिल्हे येतात. या दोन्ही शिक्षण मंडळाचा प्रचंड मोठा विस्तार आहे. असाच विस्तार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा होता. राज्य सरकारने नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे २००९ मध्ये अधिसूचना जारी करून केले व २०११ मध्ये प्रत्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे काम सुरू झाले. नागपूर विभागीय शिक्षण मंडळात जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्याने या विभागीय शिक्षण मंडळाचे विभाजन करून शैक्षणिकदृष्ट्या मागास भाग असलेल्या गडचिरोली येथे नवे शिक्षण मंडळ सुरू करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. परंतु वित्त विभागाने या कामात मेख घातल्याने हा प्रस्ताव राज्य सरकारने प्रलंबित ठेवला आहे. आता राज्यात सत्तांतरण झाले असून मागास भागाच्या विकासाला चालणा देण्याची भूमिका नव्या सरकारने स्वीकारली आहे.
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या चार जिल्ह्यांसाठी गडचिरोली येथे नवे विभागीय शिक्षण मंडळ निर्माण करण्यात यावे, अशी मागणी आहे. गडचिरोली, चंद्रपूर हे शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्हे आहे. नवे शिक्षण मंडळ निर्माण झाल्यास या भागाच्या शैक्षणिक विकासाला गती देता येईल. परंतु राज्य सरकार या प्रश्नाबाबत कायम उदासीन राहिले आहे. गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्यात आले. मात्र या विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले होते. राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाल्यावर गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या. गोंडवाना विद्यापीठाला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. पूर्णवेळ कुलगुरू नियुक्त करण्यात आले. त्यामुळे या भागाच्या शैक्षणिक विकासाबाबत शासनाची तत्परता दिसून आली. त्याच पद्धतीने नवे विभागीय शिक्षण मंडळ गडचिरोली येथे देण्यात यावे, अशी मागणी जुनी आहे. त्यावर अंमलजबावणी नागपूर अधिवेशनात करावी, अशी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मागणी आहे.

कृषी विद्यापीठही गडचिरोलीतच हवे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे विभाजन प्रस्तावित आहे. पश्चिम विदर्भातील या विद्यापीठाचे विभाजन करून पूर्व विदर्भात एक कृषी विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे. राज्याचे विद्यमान वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याबाबत आग्रही भूमिका घेऊन आहेत. या कृषी विद्यापीठासाठी सिंदेवाही, मूल या दोन ठिकाणांचा विचार सध्या सुरू आहे. मूल हे मुनगंटीवारांच्या मतदार संघात येणारा भाग आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याने मागील १० वर्षात कृषी क्षेत्रात प्रचंड भरारी मारली आहे. या भागात यांत्रिकी शेतीचा विस्तारही वाढला आहे. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन गडचिरोली येथे कृषी महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालय सुरू करून ते थांबले नाहीत तर त्यांनी या महाविद्यालयासाठी प्रशस्त मोठी इमारतसुद्धा निर्माण केली. या इमारतीतच नवे कृषी विद्यापीठ अस्तित्वात आणता येऊ शकते. त्यामुळे गडचिरोलीचाच विचार कृषी विद्यापीठाबाबतही करणे सोयीचे ठरेल. गडचिरोलीला रेल्वे मार्गाचे जाळेही निर्माण केले जात आहे. उच्च प्रतिचा तांदूळ येथे निर्माण होतो. त्यावर संशोधन कृषी विद्यापीठ झाल्यास शक्य होणार आहे. रेल्वे मार्गावर असल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही गडचिरोली सोयीचे होईल. त्यामुळे कृषी विद्यापीठासाठीही लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव वाढवावा, अशी मागणी या भागातील शेतकरी, विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Give Gadchiroli Education Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.