वनकर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन द्या
By Admin | Updated: August 20, 2016 01:28 IST2016-08-20T01:28:32+5:302016-08-20T01:28:32+5:30
दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वनसंरक्षणाचे काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दुप्पट वेतन देण्यात यावे,

वनकर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन द्या
वनमंत्र्यांना निवेदन : वनरक्षक, वनपाल संघटनेची मागणी
आरमोरी/कुरखेडा : दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वनसंरक्षणाचे काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दुप्पट वेतन देण्यात यावे, यासंदर्भातील प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांनी शासनाकडे पाठविला आहे. यासंदर्भात शासनाने निर्णय घेऊन गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वनकर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटना नागपूरचे सचिव गाजी शेख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देसाईगंज येथील विश्रामगृहावर भेट घेऊन केली आहे.
गडचिरोेली जिल्ह्यात कार्यरत पोलीस कर्मचारी व भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना शासन दीडपट वेतन देत आहे. वनकर्मचारी सुद्धा दुर्गम भागात राहून वनसंपत्तीचे जतन करीत आहेत. मात्र राज्य शासन त्यांना दुप्पट वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. दुप्पट वेतनाबाबत २७ जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही निर्णय घेतला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे शिवकांत पवार, संजय पिल्लारे, नागोसे, मेहफूज सय्यद, पाटील, सोंधिया आदी उपस्थित होते. इतरही समस्यांवर शिष्टमंडळाने वनमंत्र्यांसोबत चर्चा केली.