कृउबासमध्ये धान विकणाऱ्यांना बोनस द्या
By Admin | Updated: January 9, 2016 01:55 IST2016-01-09T01:55:41+5:302016-01-09T01:55:41+5:30
आधारभूत किमतीनुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.

कृउबासमध्ये धान विकणाऱ्यांना बोनस द्या
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ंंगडचिरोली : आधारभूत किमतीनुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु जे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मार्फतीने धान विक्री करतात अशांना बोनसचा लाभ मिळत नाही. परिणामी शेतकरी बोनसपासून वंचित राहतो. त्यामुळे कृबासमार्फत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रति क्विंटल २०० रूपये बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धान विकल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पैशाची आवश्यकता असते. कृषी उत्पन्न बाजार समितीत त्वरित रक्कम मिळत असते. यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान विकून आपली गरज भागवितो. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकल्यानंतर रक्कम त्वरित मिळत नाही. अनेकदा दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना धान चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागते. नाईलाजास्तव शेतकरी धान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्वरित पैसे मिळण्याच्या हेतूने विकतात. आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांना येत असते. अशा शेतकऱ्यांना शासकीय धोरणानुसार घेण्यात येणाऱ्या बोनसचा लाभ मिळत नाही. यात गरीब, गरजू शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सदर नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना २०० रूपये प्रतिक्विंटल बोनसचा लाभ द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या संदर्भात राकाँतर्फे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, आमदारांनाही निवेदन सादर केले आहे. निवेदन देताना सचिव जयदेव मानकर, विवेक बाबनवाडे, तुकाराम पुरणवार हजर होते. (शहर प्रतिनिधी)