सर्व कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ द्या
By Admin | Updated: February 5, 2016 01:04 IST2016-02-05T01:04:01+5:302016-02-05T01:04:01+5:30
शासनाने शेतकऱ्यांचे खासगी सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र सावकारांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार कच्च्या स्वरूपात होत असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सर्व कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ द्या
पत्रकार परिषद : सावकारग्रस्त शेतकरी संघटनेची मागणी
कुरखेडा : शासनाने शेतकऱ्यांचे खासगी सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र सावकारांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार कच्च्या स्वरूपात होत असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावकारांच्या संपूर्ण कच्च्या व पक्क्या व्यवहारांची चौकशी करून या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने कुरखेडा येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
राज्य शासनाने ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडे वस्तू गहाण ठेवत घेतलेले संपूर्ण कर्ज व व्याजाची रक्कम माफ करीत सावकारांकडून लाभार्थ्यांची यादी मागितली. मात्र शासनाकडे भरणा करावयाचा कर वाचविण्याकरिता बहुसंख्य नोंदणीकृत सावकारांनी मोठ्या प्रमाणावर कच्च्या बिलावरच व्यवहार केले. कुरखेडा तालुक्यात तीन ते चार हजार सावकारी कर्जदार असतांना केवळ १७६ लाभार्थ्यांची यादी सावकारांनी शासनाला दिली. परिणामी अनेक कर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास १३ फेब्रुवारीला कुरखेडा तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कवरके, प्रल्हाद धोंडगे, धर्मा दरवडे, शिवा राऊत, उत्तम कीर्तनीया, हेमंत कवरके, नामदेव लोहंबरे, पुंडलिक दादगाये, लता सहारे, मुरलीधर जोगे, ऋषी सोनकुसरे, गुरूदेव मारगाये, सुदाम सुकारे, देवनाथ नैताम, झोडे यांनी दिला आहे.