रेगडीत बँक शाखा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:53+5:302021-07-09T04:23:53+5:30

घाेट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी ...

Give a bank branch in Regadi | रेगडीत बँक शाखा द्या

रेगडीत बँक शाखा द्या

घाेट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय येथे पोलीस मदत केंद्र व अन्य कार्यालये आहेत.

नाल्यांची दुरवस्था

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले

गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांमुळे वादळ, वारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो.

ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र, अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत असून काही धूळ खात आहेत.

माेबाईल टाॅवर कुचकामी

धानाेरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे; परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी हाेत आहे.

वाहतूक होते प्रभावित

कमलापूर : कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यावर अद्याप पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

उपकेंद्र भाड्याच्या खाेलीत

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहे. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधावी.

स्मशानभूमींची दुरवस्था

कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून जाता येत नाही.

पूल बांधण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.

गतिरोधक निर्माण करा

आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गतिराेधकाचे बांधकाम अजूनपर्यंत हाेऊ शकले नाही.

Web Title: Give a bank branch in Regadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.