शाळेपर्यंतचा मुलींचा प्रवास बसमुळे झाला सुकर

By Admin | Updated: December 18, 2014 22:54 IST2014-12-18T22:54:15+5:302014-12-18T22:54:15+5:30

नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातच येथील विद्यार्थिनींना आता शासनाच्या मानव विकास मिशनचा आधार मिळाल्यामुळे शिक्षणाचा

The girls travel to the school due to the bus | शाळेपर्यंतचा मुलींचा प्रवास बसमुळे झाला सुकर

शाळेपर्यंतचा मुलींचा प्रवास बसमुळे झाला सुकर

गडचिरोली : नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातच येथील विद्यार्थिनींना आता शासनाच्या मानव विकास मिशनचा आधार मिळाल्यामुळे शिक्षणाचा अडसर दूर होऊन गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा प्रवास सुखकर झाला आहे.
गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील असलेला नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात अतिदुर्गम भागात लोकवस्ती आढळते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहतुकीची योग्य सोय नसल्यामुळे मुलींना आठवीनंतर बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे अवघड झाले होते. या भागातील मुलींचे कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण होणार असल्यामुळे बालविवाहाला आळा बसेल. मुलींचे लग्न योग्य वयात झाल्यामुळे जन्माला येणाऱ्या बालकांची कुपोषणाची समस्या सुटेल. विद्याथीर्नींची अनेक कि.मी. पायपीट थांबावी म्हणून शासनाने २९ जून २००६ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व मुलींना इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरीता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करणे, हा शासनाचा मुख्य हेतू आहे. या बसेसमध्ये विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलत आहे. या मिशन अंतर्गत गडचिरोली बसस्थानकातून दररोज ५५ बसेस सोडण्यात येतात.
त्यात गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, चामोर्शी व धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या अकरा तालुक्यांचा समावेश आहे.
या तालुक्यातील विविध गावांमधून निश्चित केलेल्या वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५५ बसेसमधून दररोज विद्याथीर्नी प्रवास करतात. एकूण जिल्ह्यातील ११ तालुक्यात प्रत्येकी ५ बसेस देण्यात आल्या आहेत.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The girls travel to the school due to the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.