बस न थांबल्याने विद्यार्थिनी सायंकाळपर्यंत राहिल्या उभ्या
By Admin | Updated: July 29, 2016 01:17 IST2016-07-29T01:17:12+5:302016-07-29T01:17:12+5:30
येथील महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनींची शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसथांब्यावर बुधवारी सायंकाळी उभ्या होत्या.

बस न थांबल्याने विद्यार्थिनी सायंकाळपर्यंत राहिल्या उभ्या
आष्टी येथील प्रकार : बस चालकावर कारवाईची मागणी
आष्टी : येथील महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनींची शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसथांब्यावर बुधवारी सायंकाळी उभ्या होत्या. दरम्यान सुपर बस आली. मात्र सदर बसच्या चालकाने बस न थांबविल्याने शालेय विद्यार्थिनींना सायंकाळी ६. ३० वाजेपर्यंत बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे बस आगाराविषयी पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. सदर बसच्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शासनाने मुलींसाठी मोफत पास योजना सुरू केली आहे. याकरिता मानव विकास मिशन योजनेंतर्गत बस आगाराला नव्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी या बसेस पोहोचत नसल्याने मुलींना सुपर बसशिवाय पर्याय राहत नाही. मात्र सुपर बसचे चालक मुलींना बसमध्ये घेत नाही. असाच प्रकार आष्टी परिसरात मार्र्कंडा (कं.) येथील बसथांब्यावरही घडला. मार्र्कंडा (कं.) हा बसथांबा नसल्याचे कारण सांगून मुलींना बसमध्ये बसण्यास मज्जावही यापूर्वी करण्यात आला.
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना अनेकदा बसमध्ये प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थिनींना सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागते. तसेच या भागात अहेरी आगाराच्या बसेस चंदनखेडी येथे थांबत नसल्याने रामनगट्टा, चंदनखेडी येथील मुलींना शाळेत येण्यासाठी साधारण बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेसाठी उशीर होतो. अनेकदा तासही बुडतात. परिणामी या विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता चंदनखेडी येथे सुपर बसचा थांबा द्यावा, तसेच मार्र्कंडा (कं.) येथील मुलींना सुपर बसमध्ये बसू देण्यासंबंधी आगार प्रमुखांनी वाहकचालकांना सूचना द्याव्या, अशी मागणी या भागातील पालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)