घोटमध्ये साकारली प्रतिरूप संसद
By Admin | Updated: October 3, 2015 01:23 IST2015-10-03T01:23:45+5:302015-10-03T01:23:45+5:30
स्थानिक नवोदय विद्यालयात गुरूवारी भारताच्या संसदेचे प्रतिरूप साकारण्यात आले.

घोटमध्ये साकारली प्रतिरूप संसद
विद्यार्थी बनले खासदार : अशोक नेतेंनी लावली हजेरी
घोट : स्थानिक नवोदय विद्यालयात गुरूवारी भारताच्या संसदेचे प्रतिरूप साकारण्यात आले. विद्यार्थ्यांनी खासदार बणून शाळेच्या समस्या प्रतिरूप संसदेसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार, अशोक पोरेड्डीवार, बाळा येनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकरांचे संविधान निर्माण कार्यालयातील योगदान व भारत देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार नवोदय विद्यालयात प्रतिरूप संसद साकारण्यात आली. प्रतिरूप संसद तयार करण्यासाठी सामाजिकशास्त्राचे शिक्षक भगवान वंजारे, प्राचार्य जी. पोटय्या, उपप्राचार्य चंद्रशेखर यांनी विशेष सहकार्य केले.
यशस्वीतेसाठी एम. व्यंकय्या, एम. एम. वरभे, यू, व्ही. वारे, औदूंबर ढगे, संजय चौधरी, प्रवीण देशमुख, विद्या गलगटे, ओमप्रकाश साखरे, बल्लेलवार, वालदे, श्याम रामटेके यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. लेखन व दिग्दर्शन भगवान वंजारे यांनी केले. (वार्ताहर)
संसदेचे कार्य समजण्यास मदत
प्रतिरूप संसदेमध्ये विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थी प्रतिनिधीचा समावेश होता. विद्यार्थी प्रतिनिधी हे खासदारांच्या रूपात वावरत होते. खासदार ज्या प्रमाणे आपल्या क्षेत्रातील समस्या संसदेत मांडतात, त्याचप्रमाणे अध्ययन करताना विद्यार्थ्यांना कोणती अडचण जाणवत आहे, शाळेमध्ये कोणत्या सोयीसुविधा असणे आवश्यक आहे, याबद्दलचे प्रश्न विचारून त्याचे निराकरण कशा पद्धतीने करता येईल, याबाबतही चर्चा करण्यात येत होती. यामुळे संसदेचे कार्य समजण्यास मदत झाली.