सीमावर्ती भागातून दारू व्यापार वाढविण्याची तस्करांची छुपी योजना तयार
By Admin | Updated: January 1, 2015 23:00 IST2015-01-01T23:00:46+5:302015-01-01T23:00:46+5:30
गडचिरोली हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र येथील सीमावर्ती तालुक्यांमध्ये परप्रांतातून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दारू आयात केली जात आहे. आता राज्यशासन चंद्रपूर

सीमावर्ती भागातून दारू व्यापार वाढविण्याची तस्करांची छुपी योजना तयार
गडचिरोली : गडचिरोली हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र येथील सीमावर्ती तालुक्यांमध्ये परप्रांतातून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दारू आयात केली जात आहे. आता राज्यशासन चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या दारूबंदीच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या लोकांनी आता गडचिरोली व चंद्रपूर या दोनही जिल्ह्यात तस्करीच्या मार्गाने दारू पोहोचविण्यासाठी व्यापक आराखडे तयार केले आहे. यादृष्टीने छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील दारू व्यवसायिकांशीही संधान बांधण्यात आले आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. त्यानुसार बंदीच्या जिल्ह्यातील बेरोजगारांना या कामात ओढून त्यांच्या माध्यमातून हा सारा अवैध व्यापार दोन जिल्ह्यात पसरविण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. मात्र अंमलबजावणीचे यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष आहे.
महाराष्ट्रापेक्षा छत्तीसगडमध्ये ५० टक्के कमी दराने दारू स्वस्तात उपलब्ध होते. तर तेलंगणा व आंध्रप्रदेशमध्ये २० ते २२ टक्के कमी दराने दारू स्वस्त आहे. येथे अनेक कर दारूविक्रीसाठी माफ करण्यात आले आहे. ‘विका आणि कमवा’ या तत्वावर ही दुकाने चालविण्यासाठी दिली जातात व शेवटच्या टोकावरच्या गावाच्या दुकानाच्या नावाने उचलेली पूर्ण दारू महाराष्ट्राच्या गडचिरोलीत पाठविली जाते. जेवढा जास्त धंदा होईल तेवढा अधिक नफा मिळेल, या आशेने भरमसाठ दारू सीमावर्ती भागातून बंदीच्या या जिल्ह्यात पोहोचत आहे. या कामासाठी आंध्र, तेलंगणा व छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातील जवळजवळ ५ ते ७ हजार लोकांना सध्या अवैध रोजगार मिळत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या सीमावर्ती भागात गोदावरी नदीच्या पात्रात तेथील परवानाप्राप्त दुकानाने आपले विस्तारीत कक्षही सुरू केले. सिरोंचातून डोंग्याने जाऊन नागरिक येथे सहजपणे दारू खरेदी करू शकतात, असे चित्र आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणा या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा, कढोली, वैरागड आदी भागात बनावट दारू तयार करणारे कारखाने मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गडचिरोली जिल्हा दारूबंदी असला तरी येथे सर्व कंपन्यांची बनावट दारू सहजतेने उपलब्ध होते. राज्य सीमांवर तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेले नाही. त्यामुळे राज्य सीमेवरील पोलीस यंत्रणेचेही यावर नियंत्रण राहिलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)