सरपंचावरील गुन्हे मागे घेऊन सुटका करा
By Admin | Updated: November 29, 2015 02:11 IST2015-11-29T02:11:32+5:302015-11-29T02:11:32+5:30
२३ नोव्हेंबर रोजी सोमवारला पुलखल ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली.

सरपंचावरील गुन्हे मागे घेऊन सुटका करा
चौकशी न करता पोलिसांकडून चुकीची कारवाई : पुलखलवासीयांचा आरोप; आंदोलनाचा इशारा
गडचिरोली : २३ नोव्हेंबर रोजी सोमवारला पुलखल ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर सरपंच संतोषकुमार शेडमाके यांनी घरकुलाच्या मुद्दा उपस्थित करून ग्रामसेवक गुरूदेव पिंपळे यांना विचारणा केली. दरम्यान सरपंचांनी ग्रामसेवकाला कोणत्याही प्रकारची मारहाण व शिविगाळ केली नाही. खोट्या तक्रारीवरून सरपंच शेडमाके यांच्यावर पोलिसांनी कोणतीही मोका चौकशी न करता चुकीची कारवाई केली, असा आरोप करीत सरपंच शेडमाके यांच्या वरील गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष सुटका करण्यात यावी, अशी मागणी पुलखल ग्रामपंचायतीचे सदस्य, तंमुसचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
सरपंच शेडमाके यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सोमवारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देणार आहोत, अशी माहिती पदाधिकारी व ग्रामस्थांनी यावेळी दिली. सरपंच शेडमाके यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका न केल्यास पोलीस प्रशासनाच्या विरोधात संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकारी व ग्रामस्थांनी यावेळी दिला.
पत्रकार परिषदेला पुलखलचे उपसरपंच टिकचंद ठाकरे, ग्रा.पं. सदस्य भारती चिमुरकर, भानूदास अलाम, तंमुस अध्यक्ष सदाशिव वाघरे, सदस्य खुशाल ठाकरे, देवाजी तांगडे, मंदिप गोरडवार, यशवंत जेठीवार, वंदना बावणे, सुधीर रोडे उपस्थित होते. ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना एका घरकूल लाभार्थ्यावर झालेल्या अन्यायाबाबत तसेच ग्रामस्थांच्या समस्यांबाबत ग्रामसेवकांना विचारण्याचा तसेच चर्चा करण्याचा अधिकार नाही का? ही तर लोकशाहीची थट्टा आहे, असेही पुलखलवासीय यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)