प्रलंबित बुडीत मजुरी मिळणार
By Admin | Updated: August 22, 2016 02:11 IST2016-08-22T02:11:49+5:302016-08-22T02:11:49+5:30
मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रसूत झालेल्या महिलांना प्रत्येकी ४ हजार रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

प्रलंबित बुडीत मजुरी मिळणार
९ हजार ५८ महिलांना होणार लाभ : ३ कोटी ६२ लाख ३२ हजारांचा निधी जि. प. ला प्राप्त
दिलीप दहेलकर गडचिरोली
मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रसूत झालेल्या महिलांना प्रत्येकी ४ हजार रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र सन २०१५-१६ वर्षातील महिलांसाठी सदर मजुरीची रक्कम अदा करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला वर्षभरापासून निधी मिळाला नव्हता. आता जुलै महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून ३ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपयांचा निधी मिळाल्याने सदर निधी लाभार्थी महिलांना वितरित करण्यात येणार आहे. याचा लाभ ११ तालुक्यातील ९ हजार ५८ महिलांना होणार आहे.
मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, गडचिरोली, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या ११ तालुक्यांचा मानव विकास कार्यक्रमाच्या योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रसूत झालेल्या महिलांची तीन ते चार महिने मजुरी बुडते. सदर महिला प्रसूतीच्या काळात कामावर जाऊ शकत नाही. अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रति महिलांना चार हजार रूपये बुडीत मजुरीची रक्कम देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठी ११ तालुक्यातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वर्षात ४२ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रसूत झालेल्या ११ हजार ५५८ महिलांना प्रत्येकी ४ हजार रूपये प्रमाणे ४ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपये बुडीत मजुरीपोेटी द्यावयाचे होते. जिल्हा प्रशासनाकडून आॅक्टोबर २०१५ मध्ये जि. प. च्या आरोग्य विभागाला एक कोटीचा निधी प्राप्त झाला.
आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रत्येकी ४ हजार रूपये प्रमाणे २ हजार ५०० महिलांना सदर १ कोटी रूपये वितरित केले. जिल्हा प्रशासनाकडून अत्यल्प निधी प्राप्त झाल्यामुळे ९ हजार ५८ महिला बुडीत मजुरीची रक्कम मिळण्यापासून वंचित होत्या. आता जुलै महिन्यात २०१५-१६ तील लाभार्थी महिलांसाठी ३ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपये जि. प. च्या आरोग्य विभागासाठी प्राप्त झाले आहेत. सदर निधी कोषागार कार्यालयातून जि. प. च्या आरोग्य विभागाकडे वळते करण्याची कार्यवाही सुरू आहे.
चालू वर्षासाठी चार कोटी मिळाले
सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रसूत महिलांना बुडीत मजुरीची रक्कम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ कोटी ८ लाख ५२ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सदर रक्कम ४२ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत प्रसूत होणाऱ्या महिलांना वाटप करण्यात येणार आहे. चालू वर्षात महिलांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जि. प. च्या आरोग्य विभागाला अलिकडेच ४ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. चालू वर्षातील लाभार्थी महिलांना लवकर लाभ मिळणार आहे.
महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत लाभार्थी महिलांच्या बुडीत मजुरीची रक्कम संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात वळते केली जाते. सदर रक्कम प्राप्त करण्यासाठी संबंधित महिलांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. संबंधित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी लाभार्थी महिलांच्या खात्यात बुडीत मजुरीची रक्कम वळती करतात. त्यामुळे बुडीत मजुरीची रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केली जाते.