सीआरपीएफच्या मदतीने गट्टा गाव प्रकाशमान
By Admin | Updated: March 27, 2016 01:36 IST2016-03-27T01:36:50+5:302016-03-27T01:36:50+5:30
तालुक्यातील गट्टा गावाला सीआरपीएफ जवानांनी सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे उपलब्ध करून दिले आहे.

सीआरपीएफच्या मदतीने गट्टा गाव प्रकाशमान
सिव्हीक अॅक्शन प्रोग्राम: योजनांचा लाभ घ्या
एटापल्ली : तालुक्यातील गट्टा गावाला सीआरपीएफ जवानांनी सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सदर गाव सौरऊर्जेने प्रकाशमान झाले आहे.
सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार यांच्या मार्गदर्शनात गट्टा येथे सौर पथदिवे लावण्यात आले. दुर्गम भागात वीज खंडित होण्याची समस्या आहे. पावसाळ्याच्या दिवसात एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा पथदिवे लावण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत गट्टा येथे पथदिवे लावण्यात आले. पथदिव्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सहायक कमांडंट मकवाना हिरेन, गट्टा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, द्वितीय कमान अधिकारी एन. पी. सिंग, उपकमांडंट कमलेश कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सीआरपीएफचे कमांडंट मकवाना हिरेन म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाला गट्टा येथील नागरिक उपस्थित होते. सीआरपीएफच्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे. यशस्वीतेसाठी पोलीस तसेच सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)