तज्ज्ञ डाॅक्टराअभावी गराेदर महिलांची तेलंगणात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:21+5:302021-04-18T04:36:21+5:30
सिरोंचा तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून २२० कि.मी. आणि अहेरी उपजिल्हा रुग्णालयापासून ११० कि.मी. अंतरावर आहे. सिरोंचा येथे एक ग्रामीण ...

तज्ज्ञ डाॅक्टराअभावी गराेदर महिलांची तेलंगणात धाव
सिरोंचा तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून २२० कि.मी. आणि अहेरी उपजिल्हा रुग्णालयापासून ११० कि.मी. अंतरावर आहे. सिरोंचा येथे एक ग्रामीण रुग्णालय, तर तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी पाेहाेचतात; परंतु सिराेंचा येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना तेलंगणा राज्यातील भूपालपल्ली, मंचेरियाल, वारंगल, करीमनगर आदी शहरांत उपचारासाठी जावे लागते. याठिकाणी कमी वेळेत रुग्ण पाेहाेचू शकताे, तसेच गडचिरोली- चंद्रपूर शहरांत उपचारासाठी जाण्याकरिता तब्बल ५ ते ६ तास लागतात. सध्या सिरोंचा-आलापल्ली रस्ता खड्डेमय असल्याने प्रवासासाठी अधिक वेळ लागताे. सिरोंचा तालुक्यातील नागरिक तेलगू भाषक असल्याने तेलंगणात जाऊन त्यांना उपचार घेणे सुलभ हाेते. सिरोंचाहून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या महादेवपूर येथील शासकीय सामाजिक आरोग्य केंद्रात गराेदर महिलांना भरती केले जात आहे. याठिकाणी महिला प्रसूतितज्ज्ञ असल्याने बहुतेक गरोदर महिला येथे भरती हाेतात. शत्रक्रियेच्या साेयीसह स्कॅनिंग, महिला प्रसूतितज्ज्ञ आहेत, तसेच तेलगू बोलीभाषा असल्याने महिलांना अडचणी येत नाहीत, असे दाखल झालेल्या गराेदर महिला सांगतात.
बाॅक्स
महादेवपूरच्या आराेग्य केंद्रात ४८ प्रसूती
तेलंगणा राज्याच्या महादेवपूर शासकीय सामाजिक आरोग्य केंद्रात यावर्षी सिरोंचा तालुक्यातील ४८ प्रसूती झाल्या आहेत. २६ महिला सर्वसाधारण, तर २२ महिलांची प्रसूती शस्त्रकियेद्वारे झाली आहे, असे महादेवपूर येथील डॉक्टर परवीन कुमार यांनी सांगितले. सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात नुकतीच प्रसूतितज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली; परंतु तांत्रिक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांवर याेग्य उपचार हाेत नसल्याची तक्रार तालुक्यातील अनेक नागरिकांची आहे.