गांधी विचारात सर्वच समस्यांवरील उपाय
By Admin | Updated: August 13, 2016 01:42 IST2016-08-13T01:42:43+5:302016-08-13T01:42:43+5:30
महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत.

गांधी विचारात सर्वच समस्यांवरील उपाय
पोलीस अधीक्षकांचे प्रतिपादन : आत्मसमर्पितांसाठी ‘गांधी शांती विचार परीक्षा’
गडचिरोली : महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत. हे विचार प्रत्येक व्यक्तीने अंगीकारले पाहिजे. माओवादी व महात्मा गांधी यांच्या विचारसरणीत फार मोठे अंतर आहे. आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींच्या मनातून माओवादी व हिंसावादी विचार कायमचे काढून टाकण्यासाठी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींनी ही परीक्षा दिली आहे. त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
आत्मसमर्पित नक्षल्यांना शांतीच्या मार्गाने जीवन जगता यावे, यासाठी आदर्श मित्र मंडळ पुणे, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था बल्लारपूर व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत सहभागी झालेल्या आत्मसमर्पितांना प्रमाणपत्र व पदकाच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सूंचुवार, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, एसडीपीओ डॉ. सागर कवडे, परीक्षाविधीन एसडीपीओ डॉ. रणजित पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह गणेश बिरादार, परीक्षा समन्वयक लक्ष्मण बोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ५६ आत्मसमर्पितांनी सदर परीक्षा दिली. परीक्षेपूर्वी या सर्वांना गांधी विचारांचे पुस्तक देण्यात आले. त्याचबरोबर गांधीजींच्या शांतीच्या मार्गाविषयी मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना उदय जगताप यांनी चुकीच्या विचारांमुळे येथील आदिवासी युवक व जनता भरकटली जात आहे. मार्ग अनेक असले तरी योग्य मार्गाची निवड करण्याचा शहाणपणा प्रत्येक व्यक्तीने दाखविला पाहिजे. गांधी विचारानंतर आत्मसमर्पितांचे मतपरिवर्तन झाले असून त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे आवाहन केले.
प्रास्ताविक एसडीपीओ डॉ. सागर कवडे, संचालन पीएसआय तेजस्वी पाटील, आभार पीएसआय राजपूत यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
क्रिष्णा व रघुने उलगडला नक्षल चळवळीतील फोलपणा
अहिंसेच्या मार्गाने काहीच साध्य होत नाही. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारावाच लागतो, अशी शिकवण नक्षल्यांकडून दिली जाते. त्याचबरोबर मोठमोठी स्वप्न दाखविली जातात. या विचारांना बळी पडून आदिवासी युवक नक्षल चळवळीमध्ये सहभागी होते. नक्षल चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर या चळवळीतील फोलपणा लक्षात येते. वरिष्ठांचे आदेश पाळत जंगलात व पहाडांवर रात्रंदिवस फिरावे लागते. कधी-कधी दोन ते तीन दिवस उपाशी राहण्याचे संकटही झेलावे लागत असल्याचे सत्य आत्मसमर्पित क्रिष्णा मासा दोरपेटी व रघु लालसाय सडमेक यांनी बोलून दाखविले.