स्ट्रायकर नावाच्या गेमवर सुरू आहे जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST2021-02-21T05:09:21+5:302021-02-21T05:09:21+5:30
लोकमत न्युज नेटवर्क देसाईगंज : शहराच्या मुख्य रस्त्यावर मागील कित्येक दिवसांपासून स्ट्रायकर नावाचा अवैध खेळ राजरोसपणे सुरू आहे. मोलमजुरी ...

स्ट्रायकर नावाच्या गेमवर सुरू आहे जुगार
लोकमत न्युज नेटवर्क
देसाईगंज : शहराच्या मुख्य रस्त्यावर मागील कित्येक दिवसांपासून स्ट्रायकर नावाचा अवैध खेळ राजरोसपणे सुरू आहे. मोलमजुरी करणारे कामगार, काही शेतकरी आणि शालेय विद्यार्थी अधिक पैसा कमविण्याच्या नादात या खेळामध्ये पैशाचा जुगार खेळत असल्यामुळे तरुणाई त्याच्या आहारी जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
देसाईगंज शहरात दररोज परिसरातील मोलमजुरी करणारे कामगार, शेतकरी, विद्यार्थी येतात. त्यांना नजरेसमोर ठेवून बाहेरच्या शहरातून येऊन काही जणांनी स्ट्रायकर नावाचा अवैध गेम सुरू केला आहे. हातगाडीवर चालणाऱ्या या खेळात तीन गोलाकार प्लेट्स एकीकडून दुसरीकडे नेत प्लेट्स खाली असलेल्या वस्तूवर पैसे लावावे लागतात. अधिक पैसा कमाविण्याच्या नादात जुगाऱ्यांचेे हजारो रुपये हातचलाखीने खेळ चालविणारे गिळंकृत करीत आहेत.
खेळचालक स्वतःचे १० जुगाऱ्यांची गर्दी सोेबत ठेवून स्ट्रायकरवर पैसा लावणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. याला मोलमजुरी करणारे कामगार व तरुणाई बळी पडत आहेत. स्ट्रायकर हा गेम पूर्णपणे अवैध असूनदेखील शहराच्या मुख्य रस्त्यावर परवानाप्राप्त खेळाप्रमाणे राजरोसपणे सुरू आहे. कित्येकदा खेळात हाणामारीदेखील हाेत असते. काही वेळा बळजबरीने रक्कमदेखील हिसकावली जाते. खेळ सुरू असताना वाहतूक पोलीस खेळाच्या हातगाडीसमोरून जातात. मात्र, अलिखित परवाना मिळालेल्या खेळाला बंद करण्याचे धाडस दाखवत नसल्याचे दिसत आहे. या अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांना कोणाचा वरदहस्त लाभलेला आहे, हे समजण्यापलीकडे आहे.
बाॅक्स.....
नियमित पोलीस निरीक्षक आवश्यक
१९ ग्रामपंचायतीसोबत शहराची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी तसेच अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये नियमित पोलीस निरीक्षक आवश्यक आहे. पाेलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांची बदली झाल्यापासून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडे पदाचा प्रभार आहे. शहर पोलीस स्टेशनमध्ये नियमित पोलीस निरीक्षक देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.