गडकरी वाड्यावर धडकणार

By Admin | Updated: July 28, 2016 02:11 IST2016-07-28T02:11:30+5:302016-07-28T02:11:30+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भवाद्यांना भाजपची सरकार केंद्रात आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ,

Gadkari will hit the castle | गडकरी वाड्यावर धडकणार

गडकरी वाड्यावर धडकणार

क्रांतीदिनी पाच हजार विदर्भवादी : वामनराव चटप, राम नेवले यांची माहिती
गडचिरोली : भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भवाद्यांना भाजपची सरकार केंद्रात आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ देण्याची त्यांची तयारी दिसून येत नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गडकरी यांना जाब विचारण्यासाठी विदर्भातून पाच हजार विदर्भवादी कार्यकर्ते गडकरी वाड्यावर धडक देणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री रमेश गजबे, अ‍ॅड. नंदा पराते, अरूण मुनघाटे, किशोर पोतनवार, अरूण केदार, चंद्रशेखर भडांगे, रमेश भुरसे, प्रतिभा चौधरी, पं.स. सदस्य अमिता मडावी, एजाज शेख आदी उपस्थित होते.
यावेळी राम नेवले म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई तीव्र करून नागपूर येथील ठिय्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी १ जुलैपासून विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात दौरे करून जिल्हा बैठका घेण्यात आल्या. बुधवारी गडचिरोली येथे झालेली शेवटची जिल्हा बैठक होती. गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आम्ही जनजागृती करीत आहोत, जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यांनी त्या संदर्भात कामही सुरू केले आहे. त्यामुळे आता विदर्भ राज्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे नेवले यावेळी म्हणाले. अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे. मात्र भाजप सरकारकडून विदर्भावर अन्याय केला जात आहे. नागपूर करारानुसार विदर्भातील शासकीय व निमशासकीय अशा एकूण चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे भारनियमन तसेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा मिळण्यासाठी धानाच्या हमीभावाचा प्रश्न कायम आहे. विदर्भातील जनतेचे अनेक प्रश्न असल्याने स्वतंत्र विदर्भ निर्माण झाल्याशिवाय लोकांना न्याय खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही.
यावर स्वतंत्र विदर्भ हाच खरा पर्याय आहे. त्यामुळे आरपारची लढाई आम्ही विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप सरकारच्या विरोधात लढणार आहोत, असे अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: Gadkari will hit the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.