गडचिरोलीचा शंतनू मिसार ठरला देशातला चौथा सर्वोत्तम एनसीसी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 20:10 IST2022-01-29T20:05:39+5:302022-01-29T20:10:02+5:30
Gadchiroli News नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) निवडक २१५५ विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या कोंढाळा येथील शंतनू धनपाल मिसार या विद्यार्थ्याने सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून देशात चौथा क्रमांक पटकावला आहे.

गडचिरोलीचा शंतनू मिसार ठरला देशातला चौथा सर्वोत्तम एनसीसी विद्यार्थी
गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार संचलनासाठी राजधानी नवी दिल्लीत जमलेल्या देशभरातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) निवडक २१५५ विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या कोंढाळा येथील शंतनू धनपाल मिसार या विद्यार्थ्याने सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. शंतनू हा पुणे येथील नौरोजी वाडिया कॉलेजमध्ये बीएस्सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. या शिबिरात महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने पंतप्रधान चषक पटकावला आहे. त्यात सर्वोत्कृष्ट छात्रसैनिक म्हणूनही महाराष्ट्राच्या पथकातील विद्यार्थ्यांनी छाप पाडली.
देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील शंतनूचे बारावीपर्यंतचे शिक्षण ग्रामीण पार्श्वभूमीतच वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. वर्षभरापूर्वी तो पुण्यात शिकायला गेला. त्याचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत.
फायटर पायलट बनण्याचे स्वप्न
पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये एनसीसीच्या एअर विंगमध्ये असलेल्या शंतनूने अवघ्या वर्षभरात दाखविलेली ही चमक त्याच्या भविष्यातील उज्ज्वल कामगिरीची झलक देत आहे. भारतीय वायुदलात ‘फायटर पायलट’ बनण्याचे स्वप्न असल्याचे शंतनूने ‘लोकमत’ला सांगितले.